Digital arrest scam | मोबाईल ‘फ्लाईट मोड’वर टाकून आई-वडिलांना ‘डिजिटल अरेस्ट’पासून वाचवले!

आठवीतील तेरा वर्षांच्या मुलाची हुशारी
Digital arrest scam |
Digital arrest scam | मोबाईल ‘फ्लाईट मोड’वर टाकून आई-वडिलांना ‘डिजिटल अरेस्ट’पासून वाचवले!
Published on
Updated on

लखनौ : आजच्या काळात जिथे मोठे लोक सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत, तिथे उत्तर प्रदेशच्या बरेली येथील एका 13 वर्षांच्या मुलाने आपल्या हुशारीने पालकांना लुटण्यापासून वाचवल्याचे प्रकरण समोर आले आहे. तन्मय नावाच्या या आठवीतील विद्यार्थ्याने ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचा प्रयत्न करणार्‍या सायबर गुन्हेगारांचा डाव उधळून लावला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तन्मयचे वडील संजय सक्सेना, जे बेकरीचे मालक आहेत, त्यांना एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘एनआयए’ अधिकारी अशी करून दिली. तुमच्या फोन नंबरचा संबंध दहशतवाद्यांशी असून, 300 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाला आहे, अशी भीती त्यांना घालण्यात आली. या गुन्हेगारांनी चक्क व्हॉटस्अ‍ॅपवर बनावट अरेस्ट वॉरंट पाठवले, ज्यामुळे सक्सेना दाम्पत्य प्रचंड घाबरले. सायबर फसवणूक करणार्‍यांनी त्या जोडप्याला घराबाहेर न पडण्याचा, व्हिडीओ कॉल बंद न करण्याचा आणि खाणे, बोलणे किंवा झोपणे यासारखी प्रत्येक कृती कॅमेर्‍यासमोरच करण्याचा आदेश दिला.

फसवणूक करणार्‍यांनी त्यांच्यावर मानसिक दबाव कायम ठेवला आणि त्यांच्या संभाषणातून त्यांच्या बँक खात्यांविषयी महत्त्वाची माहिती मिळवली. त्यांचे ध्येय पैसे उकळणे हे होते आणि त्यांचे उद्दिष्ट जवळजवळ साध्य झाले होते. भीतीच्या सावटाखाली असलेल्या पालकांनी आपल्या बँक खात्यांचे तपशील, दागिने आणि मालमत्तेची माहिती गुन्हेगारांना दिली होती. फसवणूक करणार्‍यांचा डाव जवळजवळ यशस्वी झाला होता; पण संजय सक्सेना यांचा मुलगा, तन्मय, जो आठवी इयत्तेत शिकतो, त्याला परिस्थितीबद्दल संशय आला. त्याने वर्तमानपत्रांमध्ये डिजिटल अरेस्टबाबत वाचले होते, त्यामुळे हा बनाव असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण घाबरलेल्या त्या जोडप्याने ऐकण्यास नकार दिला.

अशा परिस्थितीत तन्मयने हुशारीने फोन एअरप्लेन मोडवर ठेवला, ज्यामुळे फसवणूक करणार्‍यांचा संपर्क तत्काळ तुटला आणि बँक खाती सुरक्षित राहिली. दुसर्‍या दिवशी, कुटुंब पोलिस ठाण्यात गेले आणि फोन चालू करताच त्यांना फसवणूक करणार्‍यांचा फोन आला, ज्याला पोलिसांनी प्रतिसाद देऊन कारवाई सुरू केली. दरम्यान, बरेलीचे एडीजी रमित शर्मा आणि एसएसपी अनुराग आर्य यांनी तन्मयच्या धाडसाचे कौतुक केले आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून, सक्सेना यांची सर्व बँक खाती सुरक्षित करण्यात आली आहेत. ‘मुलाने सायबर फसवणुकीविरोधातील पोलिस मोहिमांचे बारकाईने वाचन केले होते, ज्यामुळे आज हे यश मिळाले,’ असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news