टोकियो : आंबे खायला कुणाला आवडत नाहीत. सध्या बाजारात हापूस आंब्यांपासून विविध जातीच्या आंब्यांची चलती आहे. प्रत्येक आंब्याला त्याच्या चवीनुसार दर मिळतो. जाणून घेऊया जगातील सर्वात महागडा आंबा कोणता. जपानमधील मियाझाकी आंबा हा जगभरात सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो. त्याची विक्री होत नाही तर लिलाव होतो! आंबा म्हणजे फळांचा राजा. या जपानी राजाची किंमत ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. 2.50 ते 3 लाख रुपये प्रति किलो दराने हा आंबा विकला जातो!
मूळचा जपानमधील मियाझाकी शहरातून येणारा हा आंब्याचा वाण एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पिकवला जातो. मियाझाकी आंबे पिकत असताना तो लोकांना आश्चर्यचकित करतो. विशेषत: त्याचा रंग सर्वांनाच आश्चर्यचकित करतो. त्याचा रंग जांभळा असतो. तथापि, एकदा ते पूर्णपणे पिकले की तो लाल होतो. एका आंब्याचे वजन साधारण 900 ग्रॅम ते एक किलो भरते. आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच ते तीन लाख रुपये किलोने हा जपानी आंबा विकला जातो. या आंब्याला जपानी भाषेत 'तैयो नो तामागो' म्हणजे 'सूर्याचे अंडे' म्हणून ओळखले जाते. जपानमध्ये अनेक महागडी फळे पहायला मिळतात. रुबी रोमन द्राक्षे, युबारी किंग नावाचे टरबूज, डेन्सुके नावाचे कलिंगड अशी अनेक महागडी फळे आहेत. त्यामध्येच या आंब्याचाही समावेश होतो.