Fake War Videos : युद्धकाळात ‌‘एआय‌’चा गैरवापर

फेक व्हिडीओ, फोटोंमधून बक्कळ कमाई!
Fake War Videos
युद्धकाळात ‌‘एआय‌’चा गैरवापर
Published on
Updated on

लंडन : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा फायदा घेत सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) द्वारे तयार केलेल्या चुकीच्या माहितीचे मोठे जाळे पसरले आहे. बीबीसी व्हेरिफायच्या तपासानुसार, काही ऑनलाईन क्रिएटर्स केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवण्यासाठी युद्धाचे अत्यंत वास्तववादी वाटणारे बनावट व्हिडीओ आणि सॅटेलाईट इमेजेस तयार करून व्हायरल करत आहेत.

बनावट तंत्रज्ञानाचा ‌‘मनी मेकिंग‌’ धंदा

एआय साधनांच्या सुलभ उपलब्धतेमुळे आता व्यावसायिक दर्जाचे युद्धविषयक व्हिडीओ मिनिटांत तयार करणे शक्य झाले आहे. त्यातून सोशल मीडियावर फेक व्हिडीओंचा महापूर निर्माण झाला आहे. तेल अवीववरील हल्ला किंवा दुबईतील बुर्ज खलिफाला लागलेली आग, असे अनेक एआय-जनरेटेड व्हिडीओ सोशल मीडियावर कोट्यवधी वेळा पाहिले गेले आहेत. ‌‘एक्स‌’सारख्या प्लॅटफॉर्मवर क्रिएटर रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्रामद्वारे मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळवणाऱ्यांना पैसे दिले जातात. तज्ज्ञांच्या मते, हे तंत्रज्ञान सध्या मनी प्रिंटरप्रमाणे वापरले जात असून, चुकीची माहिती पसरवणारे हे एक मोठे उद्योग बनले आहेत.

सॅटेलाईट इमेजमध्ये फेरफार केवळ व्हिडीओच नव्हे, तर आता एआय-जनरेटेड सॅटेलाईट इमेजेसचाही गैरवापर होत आहे. या संदर्भात केलेल्या तपासणीत अनेक फेक व्हिडीओ असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहरीनस्थित अमेरिकन नौदल तळावर हल्ला झाल्याचा दावा करणारा एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र, गुगलच्या सिंथ-आयडी वॉटरमार्क डिटेक्टरनुसार, तो फोटो एआय टूल्सचा वापर करून एडिट केल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे, त्या फोटोतील वाहनांची जागा वर्षभरापूर्वीच्या खऱ्या सॅटेलाईट फोटोशी तंतोतंत जुळत होती.

जीपीटी आणि चॅटबॉटस्‌‍चे अपयश

दुर्दैवाची बाब म्हणजे, ‌‘एक्स‌’ मधील ‌‘ग्रोक‌’सारखे एआय चॅटबॉटस्‌‍ देखील अनेकदा अशा बनावट व्हिडीओला खरे असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत, ज्यामुळे सामान्य युजर्सची दिशाभूल होत आहे. अशा बनावटगिरीला लगाम घालण्याची गरज असताना सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्सची भूमिका काय? याकडे यूजर्सच्या नजरा होत्या. तपासणी आणि तथ्य पुढे आल्यानंतर ‌‘एक्स‌’प्लॅटफॉर्मने आता घोषणा केली आहे की, एआय-जनरेटेड युद्धविषयक व्हिडीओ लेबल न करता पोस्ट केल्यास अशा क्रिएटर्सचे मॉनेटायझेशन निलंबित केले जाईल. टिक-टॉक आणि मेटा (फेसबुक/इन्स्टाग्राम) यासारख्या इतर प्लॅटफॉर्मकडे या विषयावर स्पष्टीकरणासाठी प्रसार माध्यमांनी केली असता, त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

तज्ज्ञांचा इशारा

डिजिटल मीडिया तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियाचे सध्याचे ‌‘एंगेजमेंट‌’आधारित मॉनेटायझेशन मॉडेल आणि सत्य माहिती या दोन गोष्टींमध्ये मोठा संघर्ष आहे. जोपर्यंत हे मॉडेल बदलत नाही, तोपर्यंत चुकीच्या माहितीचा प्रसार थांबवणे कठीण आहे. सोशल मीडियावर दिसणारा कोणताही थरारक व्हिडीओ किंवा युद्धविषयक फोटो लगेच खरा मानू नका. माहितीची अधिकृत वृत्तसंस्थांकडून खातरजमा केल्याशिवाय ती फॉरवर्ड करणे टाळा, असे आवाहनही मीडिया तज्ज्ञांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news