

सिडनी : खेकडे येत आहेत...कोट्यवधींच्या संख्येने! हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या ‘ख्रिसमस आयलंड’ या छोट्या बेटावर ‘ख्रिसमस आयलंड रेड क्रॅब्स' (Gecarcoidea natalis) या लाल खेकड्यांचे वार्षिक स्थलांतर अधिकृतपणे सुरू झाले आहे. पावसाळ्यातील पहिल्या पावसामुळे या स्थलांतराची सुरुवात होते, जो सहसा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पडतो, परंतु कधीकधी हा पाऊस डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत लांबणीवरही पडू शकतो. ख्रिसमस आयलंडवरील सर्व लाल खेकडे जंगलातील आपापले अधिवास सोडून एकाच वेळी बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने आपली कूच सुरू करतात. एकदा का ते समुद्रापर्यंत पोहोचले, की तेथे ते मिलनाची प्रक्रिया पूर्ण करून अंडी घालतात.
या स्थलांतर प्रवासात नर खेकडे पुढे असतात, तर मादी खेकडे वाटेत त्यांना येऊन मिळतात. ख्रिसमस आयलंड नॅशनल पार्कच्या मते, या स्थलांतराचा वेग आणि वेळ चंद्राच्या कलांवर अवलंबून असते. पार्कच्या रेंजर्सनी लिहिल्याप्रमाणे, ‘लाल खेकडे नेहमी चंद्राच्या शेवटच्या चतुर्थांश टप्प्यात, ओहोटीच्या वेळी पहाटेच्या आधी अंडी घालतात. विशेष म्हणजे, या चांद्र तिथीनुसार आपली बिळे कधी सोडावीत, हे त्यांना अगदी अचूक ठाऊक असते.’ मात्र, आपला प्रवास सुरू करण्यासाठी खेकडे पहिल्या पावसाची वाट पाहतात, त्यामुळे त्यांना कधीकधी घाई करावी लागते. जर पाऊस त्यांच्या अंडी घालण्याच्या सर्वोत्तम वेळेच्या जवळ आला, तर खेकडे अत्यंत वेगाने समुद्राकडे वाटचाल करतात.
पाऊस जर लवकर आला, तर हे खेकडे आरामात प्रवास करू शकतात आणि ‘किनाऱ्याकडे जाताना वाटेत खाण्या-पिण्यासाठी थांबतात.’ जर अंडी घालण्याच्या वेळेपर्यंत पाऊस खूप उशिरा सुरू झाला, तर काही खेकडे आपल्या बिळांमध्येच थांबतात आणि पुढील महिन्यात आपले स्थलांतर सुरू करतात. या प्रवासाचा परिणाम अत्यंत विलोभनीय असतो. कोल्ड्रिंकच्या कॅन एवढ्या आकाराचे आणि चमकदार लाल रंगाचे कोट्यवधी खेकडे समुद्राच्या प्रवासादरम्यान १२ मैल रुंद असलेल्या या संपूर्ण बेटावर पसरतात. ते जमिनीच्या आतून आपली कूच सुरू करतात आणि सुमारे नऊ दिवसांत आपल्या अंतिम मुक्कामावर पोहोचतात. २००८ मध्ये निसर्गवादी आणि माहितीपटकार सर डेव्हिड अॅटनबरो यांनी या वार्षिक घटनेचे वर्णन त्यांच्या सर्वोत्तम टेलिव्हिजन क्षणांपैकी एक म्हणून केले होते.