वॉशिंग्टन : भूकंप, सुनामी, पूर, वादळ अशी नैसर्गिक संकटे पृथ्वीवर येत असतात. पण, अंतराळातूनही पृथ्वीवर अनेक संकटे आहेत, ज्याची माहिती आपल्याला नाही. त्यापैकीच एक म्हणजे सौरवादळ. पृथ्वीवर तशी अनेक वादळे, चक्रीवादळे पाहिली आहेत. पण, शास्त्रज्ञांनी अलीकडेच सौर वादळाचा इशारा दिला आहे. सूर्यावर आलेले हे वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्यावर दोन मोठे स्फोट झाले आहेत. सूर्याच्या पृष्ठभागावरून दोन मोठ्या सौर ज्वाला बाहेर पडल्या. त्यांना कोरोनल मास इजेक्शन म्हणतात, जे थेट पृथ्वीच्या दिशेने गेले आहेत. शास्त्रज्ञांनी त्यांना एक्स-7 आणि एक्स-9 अशी नावे दिली आहेत.
एक्स-9 फ्लेअर हा गेल्या सात वर्षांतील सूर्यापासून निघणारा सर्वात शक्तिशाली फ्लेअर आहे. सूर्याचा एक्स-9 पृथ्वीवर सौर कणांचा वर्षाव करेल. द स्पेस वेदर वेबसाईट आणि अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या आठवड्याच्या शेवटी एक मोठे वादळ मॅग्नेटोस्फियरला धडकण्याची शक्यता आहे. सौर वादळ म्हणजे सूर्याद्वारे सूर्यमालेत प्रक्षेपित केलेले कण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र आणि पदार्थ यांचा अचानक झालेला स्फोट. या वादळाला भूचुंबकीय वादळ किंवा वादळ असे म्हणतात. भारत लडाखमधून सूर्यावर लक्ष ठेवतो. सूर्यावर आलेल्या वादळावर भारतीय शास्त्रज्ञही लक्ष ठेवून आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी सांगितले की, त्यांनी भारतीय उपग्रह ऑपरेटरना सर्व खबरदारी घेण्यास सांगितले आहे. वादळ निळ्या ग्रहाकडे सरकत असल्याने पुढील काही दिवस पृथ्वीसाठी महत्त्वपूर्ण आहेत.
भूचुंबकीय वादळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात मोठा अडथळा निर्माण करू शकतात. यामुळे उत्तर गोलार्धात रेडिओ ब्लॅकआऊट, पॉवर आऊटेज आणि अरोरा इफेक्ट होऊ शकतात. दक्षिण अटलांटिक आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये तात्पुरतेसंप्रेषण ठप्प होऊ शकते. पृथ्वीभोवती फिरणार्या उपग्रहांमध्ये किरकोळ व्यत्यय येऊ शकतो आणि कमी-फ्रिक्वेंसी रेडिओ आणि नेव्हिगेशन सिस्टममध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. मोबाईल, कॉम्प्युटर आणि कम्युनिकेशन सिस्टीम यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना वादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. या वादळामुळे पृथ्वीवरील कोणालाही थेट इजा होणार नाही. कारण, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि वातावरण या सर्वात धोकादायक वादळांपासून आपले संरक्षण करते.