नवी दिल्ली : या आठवड्यात सूर्याच्या पटलावर विशालकाय विस्फोट झाला असून यातून अब्जावधी टन प्लाझ्मा बाहेर फेकला गेला आहे. हा प्लाझ्मा येत्या काही तासांत पृथ्वीला देखील प्रभावित करू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सूर्यावर जो विस्फोट झाला, त्याला कोरोनल मास इजेक्शन असे संबोधले जाते.
सदर विस्फोटानंतर सूर्याच्या दक्षिण-पश्चिम भागातून प्लाझ्मा बाहेर पडला. शक्तिशाली सौर हवा या प्लाझ्माला पृथ्वीच्या दिशेने ढकलू शकते. कोरोनल मास इजेक्शनमध्ये सूर्यपटलावरून अब्जावधी टन प्लाझ्मा अंतराळात फेकला जातो. अशी भविष्यवाणी केली गेली आहे की, प्लाझ्माचे कण पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या सॅटेलाईटस्ना बाधा पोहोचवू शकतात. यात ब्लॅकआऊटची शक्यता 10 टक्के इतकी वर्तवली गेली आहे.
प्लाझ्माच्या धारेत शक्तिशाली रेडिएशन समाविष्ट आहे, जे पृथ्वीवरील तंत्रज्ञानाला देखील नुकसान पोहोचवू शकतात. सौर हवा जी 1 जिओमॅग्नेटिक तुफानाचे देखील एक कारण ठरू शकते. ईएसएच्या सोलर अँड हिलियोस्फेरिक ऑब्झर्वटरीने या विस्फोटाची काही छायाचित्रे टिपली असून सीएमई कणांची एक धारा पृथ्वीच्या समोरील कोरोनल होलमधून निघत असल्याने पृथ्वीला काही प्रमाणात धोका असल्याचे नमूद केले गेले आहे.