Marine Ecosystem | तस्करांच्या जहाजावर सागरी जलचरांचा अधिवास

Marine Ecosystem |
Marine Ecosystem | तस्करांच्या जहाजावर सागरी जलचरांचा अधिवास
Published on: 
Updated on: 

डबलिन : आयर्लंडमध्ये २०१४ साली ३ कोटी २० लाख सिगारेटस्‌च्या तस्करीप्रकरणी पकडलेले १९७ फूट लांब जहाज आता समुद्री जीवांचे हसरे घर (अधिवास) बनले आहे. ‘एमवी शिंगल’ असे या जहाजाचे नाव होते. जप्त केल्यानंतर हे जहाज ९ वर्षे डबलिन बंदरातच उभे होते. अखेर सरकारच्या मंजुरीनंतर आयर्लंडच्या किनाऱ्यापासून दूर असलेल्या किलला खाडीत ते जाणीवपूर्वक बुडवण्यात आले होते. आता दोन वर्षांनंतर समोर आलेल्या फुटेजमध्ये हे जहाज एक कृत्रिम रीफ किंवा प्रवाळांचे स्थळ बनल्याचे दिसत असून, जलचरांनी त्यावर आपला निवारा बनवला आहे.

हे जहाज समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ९८ फूट खाली आहे. येथील अँडरवॉटर फुटेजमध्ये बार्नेकल्ज, स्पंज, सी-स्क्व्हर्टस्‌ आणि विविध मासे या जहाजावर व आसपास गोळा झाल्याचे दिसत आहेत. अटलांटिक टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीचे सागरी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जोस मारिया फरिनास-फ्रेंको यांनी सांगितले, ‘खरे सांगायचे तर हे अतिशय प्रभावी आहे. जितक्या काळापासून हे जहाज पाण्यात आहे, त्यानुसार त्यावर झालेली सागरी वाढ लक्षणीय आहे.’ जहाजाचे काही भाग अजूनही रिकामे असले, तरी बहुतांश भागांवर जलचरांनी ताबा मिळवला आहे. फरिनास-फ्रेंको यांच्या मते, कोणत्याही कृत्रिम संरचनेवर घर बनवण्यासाठी सर्वप्रथम बार्नेकलसारखे जीव येतात. त्यानंतर सी-स्क्व्हर्टस्‌सारख्या प्रजाती तिथे बस्तान मांडतात.

हळूहळू मासेही त्यांच्या मागे येतात आणि पाहता पाहता सर्व जीवांच्या राहण्यासाठी एक नैसर्गिक परिसंस्था (Eco System) तयार होते, जिथे प्रत्येकाला अन्न आणि निवारा मिळतो. मोल्दोव्हामध्ये नोंदणीकृत असलेले ‘शिंगल’ नावाचे हे जहाज २०१४ मध्ये स्लोव्हेनियाहून आयर्लंडच्या ड्रोगेडा येथे सिगारेटची तस्करी करताना पकडले गेले होते. या जहाजावर ३ कोटी २० लाख सिगारेटस्‌ भरलेल्या होत्या. कायदेशीर कारवाईनंतर आयरिश कर अधिकाऱ्यांनी या जहाजाचा ताबा घेतला. सुरुवातीला ते विकण्याची तयारी सुरू होती; पण एकही ग्राहक मिळाला नाही. या जहाजाला भंगारात (स्क्रॅप) विकणेही परवडणारे नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ते समुद्रात बुडवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी तब्बल ९ वर्षांचा अवधी लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news