

मालदा (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या उत्तरेला वसलेले ‘मालदा’ हे शहर भारतात ‘मँगो सिटी ऑफ इंडिया’ (भारताची आम्रनगरी) म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते. येथील विस्तीर्ण आंब्यांच्या बागा, समृद्ध कृषी वारसा आणि जगप्रसिद्ध आंब्यांच्या जातींमुळे भारताच्या आंबा उत्पादन आणि व्यापारात मालदा जिल्ह्याचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हा जिल्हा आंबा उत्पादक, व्यापारी आणि रसिक ग्राहकांच्या गर्दीने गजबजून जातो.
अफाट आंबा उत्पादन आणि आंब्याचा उत्कृष्ट दर्जा यामुळे मालदा गावाला हे मानाचे नाव मिळाले आहे. या जिल्ह्यात हजारो हेक्टरवर आंब्याच्या बागा पसरलेल्या असून, दरवर्षी लाखो टन आंब्याचे उत्पादन होते. येथील गंगा आणि महानंदा नद्यांमुळे सुपीक झालेली गाळाची माती, अनुकूल हवामान आणि भौगोलिक परिस्थिती आंबा लागवडीसाठी अत्यंत पूरक ठरते. येथील प्रीमियम दर्जाचा आंबा संपूर्ण भारतात पाठवला जातो. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारातही त्याची मोठी निर्यात होते. मालदा येथील आंबा लागवडीला अनेक शतकांचा इतिहास असून, मोगल काळात या व्यवसायाला खर्या अर्थाने वैभव प्राप्त झाले.
ऐतिहासिक नोंदींनुसार, बंगालच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी आणि जमीनदारांनी येथील सुपीक जमीन आणि उष्णकटिबंधीय हवामानामुळे आंबा बागायतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. येथील आंब्यांचा गोडवा, सुगंध आणि वेगळ्या पोतमुळे मालदाचे आंबे राजघराण्यांमध्ये आणि मोठ्या व्यापार्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. मध्ययुगीन बंगालची प्रमुख केंद्रे असलेली ‘गौड’ आणि ‘पांडुआ’ ही ऐतिहासिक ठिकाणेही या जिल्ह्याच्या जवळच आहेत. चव आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या मालदामध्ये आंब्याच्या अनेक लोकप्रिय जाती आढळतात. त्यामध्ये फजली, हिमसागर, लक्ष्मणभोग, लंगडा यांचा समावेश होतो. आंब्याच्या हंगामात मालदा जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल होते. हजारो शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आणि मजूर या व्यवसायात सक्रिय असतात.