

झुरीथ : शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचण्यास कठीण असणाऱ्या ठिकाणी साचलेल्या रक्ताच्या गुठळ्या नष्ट करण्यासाठी चुंबकीय शक्तीद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या ‘मायक्रोबॉट्स’चा वापर अत्यंत प्रभावी ठरू शकतो, असा दावा प्राण्यांवर केलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये करण्यात आला आहे. जीवन वाचवणाऱ्या या उपचारांची परिणामकारकता वाढवण्यासाठी हे सूक्ष्म रोबो अत्यंत उपयुक्त ठरतील.
डुकरांवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये या मायक्रोबॉट्समुळे रक्ताच्या गुठळ्या केवळ औषधांच्या तुलनेत सुमारे १० पट वेगाने विरघळण्यास मदत झाली. मानवी शरीरावरील चाचण्यांच्या पूर्वतयारीसाठी संशोधक सध्या या तंत्रज्ञानाची आणखी सुरक्षा चाचण्यांद्वारे पडताळणी करत आहेत. इथ झुरीथ येथील वैद्यकीय मायक्रोसिस्टम्सच्या प्राध्यापक आणि या संशोधन मोहिमेच्या प्रमुख सिमोन श्युरले यांनी सांगितले, ‘‘या संपूर्ण तंत्रज्ञानाची रचना निसर्गापासून प्रेरित आहे.’’ श्युरले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘काही असे सूक्ष्म जीवाणू असतात, ज्यांच्यामध्ये चुंबकीय कणांचा अंतर्भाव असतो आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून ते दिशा ठरवतात. जेव्हा हे जीवाणू फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या भौतिकशास्त्राने आणि गुणधर्मांनी आम्हाला थक्क केले.’’ इथ झुरीथने ९ नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे या संशोधनाची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप हा अभ्यास कोणत्याही पीअर-रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झालेला नाही. उपचार न केल्यास रक्ताच्या गुठळ्या जीवघेणा ठरू शकतात. या अडथळ्यांमुळे शरीराच्या मुख्य ऊतींपर्यंत रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात यांसारख्या गंभीर घटना घडू शकतात.
पेशींना ऑक्सिजन न मिळाल्याने हा धोका उद्भवतो. डॉक्टर उपकरणांच्या मदतीने गुठळ्या हाताने काढून टाकू शकतात किंवा 'थ्रोम्बोलाइटिक्स' नावाची औषधे ब्लॉकेजच्या अगदी जवळ पोहोचवू शकतात. तथापि, औषधांना त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या काही मिलिमीटरपर्यंत पोहोचवणे हा सहसा सर्वात कठीण भाग असतो. येथेच हे मायक्रोबॉट्स मदत करू शकतात. हे बॉट्स अत्यंत सूक्ष्म कण असतात, ज्यांच्या हालचाली बाह्य चुंबकांच्या मदतीने नियंत्रित केल्या जाऊ शकतात. हे चुंबक त्यांना रक्तवाहिन्यांमध्ये फिरवत आणि ढकलत पुढे नेतात. हे बॉट्स खंडित झालेला रक्तप्रवाह पुन्हा वळवू शकतात आणि अशा प्रकारे आवश्यक औषधे थेट त्यांच्या लक्ष्यस्थानी पोहोचवू शकतात, असे श्युरले आणि त्यांच्या संशोधन पथकाचे म्हणणे आहे.
बुलेटच्या आकाराच्या प्रत्येक मायक्रोबॉटमध्ये लोह ऑक्साईड नॅनोपार्टिकल्सचा एक चुंबकीय भाग असतो, ज्याभोवती हायड्रोजेल पॉलिमरचे संरक्षणात्मक आवरण असते. जेव्हा हे मायक्रोबॉट्स फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात येतात, तेव्हा ते रक्तवाहिनीत कसरतीसारख्या कोलांटउड्या मारू लागतात. याद्वारे ते लहान व्हॉर्टिसेस (भोवरे) तयार करतात, जे औषधांना सोबत वाहून नेण्यास मदत करतात.