

ओटावा : ‘बर्कशायर हॅथवे ट्रॅव्हल प्रोटेक्शन’ने (BHTP) २०२७ च्या जगातील सर्वात सुरक्षित देशांची (World Safest Places) रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये कॅनडाने जगातील सर्वोत्कृष्ट व सुरक्षित देश म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षीच्या रँकिंगमध्ये कॅनडा पाचव्या स्थानावर होता. परंतु, या वर्षी त्याने थेट अव्वल स्थान गाठले आहे. कॅनडाव्यतिरिक्त न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आईसलँड यांसारख्या देशांचाही सुरक्षित देशांच्या यादीत समावेश आहे.
२०२७ मधील पर्यटकांसाठी जगातील १० सर्वात सुरक्षित देश : १. कॅनडा २. न्यूझीलंड ३. ऑस्ट्रेलिया ४. आईसलँड ५. जपान ६. ऑस्ट्रिया ७. आयर्लंड ८. नेदरलँड ९. डेन्मार्क १०. पोर्तुगाल. टॉप १० देशांनंतर नॉर्वे, स्वित्झर्लंड, इटली, स्पेन आणि जर्मनी यांचा १५ सुरक्षित देशांमध्ये समावेश होतो. या संकेतस्थळाने १५ व्या क्रमांकापुढील देशांची यादी जाहीर केलेली नाही. BHTP सुरक्षित देशांची क्रमवारी ठरवण्यासाठी विविध मानकांचा आधार घेते. यात प्रामुख्याने : महिला, LGBTQIA+ पर्यटक आणि विविध वंशीय लोकांची सुरक्षा, हिंसक गुन्हेगारी आणि दहशतवादापासून संरक्षण, वाहतूक आणि वाहतूक यंत्रणेची सुरक्षा, आरोग्यविषयक सुविधा आणि उपाययोजना.
ही क्रमवारी प्रामुख्याने अमेरिकन पर्यटकांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी भेट दिलेल्या देशांमधील अनुभवांच्या आधारे रेटिंग देण्यात आली आहे. याशिवाय पुढील जागतिक निर्देशांकांमधील (Data Sources) माहितीचाही वापर केला गेला आहे : ग्लोबल पीस इंडेक्स, नमबेओ, जिओश्युर ग्लोबल, जागतिक आरोग्य संघटना (WHO), इक्वलडेक्स इक्वॅलिटी इंडेक्स, ग्लोबल टेररिझम इंडेक्स. BHTP नुसार, कॅनडाला महिला, LGBTQIA+ समुदाय आणि कृष्णवर्णीय गटांच्या सुरक्षेबाबत अत्यंत उत्कृष्ट गुण मिळाले आहेत. तसेच, इक्वलडेक्स इक्वॅलिटी इंडेक्स, ग्लोबल पीस इंडेक्स आणि ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्येही कॅनडाने उत्तम कामगिरी केली आहे. कॅनडा हा BHTP च्या ‘सेफ ट्रॅव्हल हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट असलेल्या आठ देशांपैकी एक आहे. २०१८ मध्ये ही रँकिंग सुरू झाल्यापासून ज्या देशांनी सातत्याने टॉप-१० मध्ये स्थान कायम ठेवले आहे, त्यांनाच या यादीत जागा दिली जाते.