तब्बल 81 वर्षांनंतर परत केले ग्रंथालयाचे पुस्तक!

तब्बल 81 वर्षांनंतर परत केले ग्रंथालयाचे पुस्तक!

वॉशिंग्टन : अनेकांना वाचण्यासाठी पुस्तक (Library ) नेले की वेळेत परत देण्याची सवयच नसते; मग हे पुस्तक एखाद्या व्यक्तीचे असो किंवा ग्रंथालयाचे. त्यामुळे अनेक ठिकाणी ठराविक मुदतीत पुस्तक परत न केल्यास दंडही ठोठावला जात असतो. अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीने 81 वर्षांनी पुस्तक परत केलं तर? अमेरिकेत असा प्रकार घडला आहे. तिथे ग्रंथालयाचे एक पुस्तक तब्बल 81 वर्षांनंतर परत करण्यात आले.

अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील एबरडीन येथील हे प्रकरण आहे. येथे एक व्यक्ती ग्रंथालयात पुस्तक परत करण्यासाठी आला असता कर्मचार्‍यांना धक्काच बसला. याचं कारण हे पुस्तक 30 मार्च 1942 रोजी देण्यात आलं होतं. म्हणजेच तब्बल 81 वर्षांनी हे पुस्तक परत करण्यात येत होतं. ग्रंथालयाने आपल्या फेसबुक पेजवर माहिती दिली की, चार्ल्स नॉरडॉफ आणि जेम्स नॉर्मन हॉल यांचं पुस्तक 'द बाऊंटी ट्रिलॉजी' तब्बल 81 वर्षांनी एबरडीन टिम्बरलैंड ग्रंथालयात परत आले आहे.

ग्रंथालयाचे हे पुस्तक जुन्या सामानात सापडले होते. ज्या व्यक्तीने हे पुस्तक घेतले होेते तो फक्त 17 पानंच वाचू शकला होता. त्याने 17 व्या पानावर लिहिले होते की, 'मला जर कोणी पैसे दिले तरी मी हे पुस्तक वाचणार नाही.' थोडक्यात, आपल्याला हे पुस्तक अजिबात आवडले नसल्याचे त्यांना सांगायचे होते. पुस्तक ग्रंथालयात उशिरा जमा केल्याचा दंड आकारला तर किती रक्कम होईल, असा विचार तुम्हीही करत असाल!

ग्रंथालयाच्या अधिकार्‍यांनी हिशेब केला असता रविवार आणि सुट्ट्या सोडल्या तर दिवसाला 2 सेंटच्या हिशेबाने तब्बल 484 डॉलर म्हणजेच 40 हजार रुपये दंड होतो. कोरोना महामारीत ग्रंथालयाने लेट फी रद्द केली होती. दरम्यान, ग्रंथालयाने आपण दंड आकारणार नसल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी मजेशीरपणे पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'यावरून तुम्हाला काय शिकायला मिळतं? जर तुमच्याकडे घेतलेले पुस्तक धूळ खात पडले असेल तर ते ग्रंथालयात परत करा.' दरम्यान, आम्ही हे पुस्तक एक गिफ्ट म्हणून सोबत ठेवत आहोत आणि कोणताही दंड आकारणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

-हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news