जगातील सर्वात मोठे भूमिगत शहर!

भूमिगत शहर
भूमिगत शहर
Published on
Updated on

इस्तंबुल : जमिनीखाली भुयार, तळघर किंवा बंकर बनवले जाणे ही काही नवलाईची बाब नाही. अलीकडेच दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरने बनवलेले आणि सोन्याने मढवलेले एक बंकरही सापडले आहे. जमिनीखालून रेल्वे धावण्याची सोय इंग्लंड, फ्रान्समध्ये शंभर वर्षांपूर्वीच करून ठेवण्यात आली होती. मात्र, एखादे अख्खे शहरच जमिनीच्या पोटात निर्माण केल्याचे आपल्या ऐकिवात नसेल. तुर्कीमध्ये असे एक शहर आहे. जमिनीमध्ये अनेक स्तरांमध्ये किंवा मजल्यांमध्ये वेगवेगळी घरे निर्माण करून हे भूमिगत शहर बनवण्यात आले होते.

हे भूमिगत शहर इतके मोठे आहे की सुमारे 20 हजार लोक या शहरात आरामात राहू शकत होते. या जुन्या भूमिगत शहरात 200 हून अधिक वस्त्या असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. तुर्कीमधील कॅपाडोशियामध्ये डेरिंक्यू नावाचा बोगदा सापडला आणि त्यामध्येच हे संपूर्ण शहर सामावले आहे. अकरा स्तरांमध्ये बांधलेल्या या बोगद्याला 600 प्रवेशद्वार आहेत. या भूमिगत शहरात लोकांची आलिशान घरे, सार्वजनिक इमारती, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, प्रार्थनास्थळे आणि अगदी दफनभूमीही आहे.

वेगवेगळ्या स्तरांदरम्यान अनेक पायर्‍याही आहेत. प्रवेशद्वारावर दगडी दरवाजे बसवण्यात आले होते. ते दीड मीटर लांब आणि 200 ते 500 किलो वजनाचे होते. हे भूमिगत शहर सापडण्याची कहाणीही रंजक आहे. सन 1963 मध्ये लोकांना या शहराची माहिती झाली. त्यावेळी एका श्रीमंत माणसाची कोंबडी अचानक गायब झाली होती. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला त्याच्या तळघरात एक छिद्र दिसले. त्यानंतर या व्यक्तीने भिंत तोडली आणि त्याला मोठा बोगदा दिसला.

त्याची माहिती त्याने सरकारला दिली व पुढील खोदकाम पुरातत्त्व संशोधकांच्या देखरेखीखाली करण्यात आले. त्यावेळी असे आढळून आले की तिथे पाचशेहून अधिक बोगदे आहेत. त्या बोगद्यांमध्ये भूमिगत घरे, धान्याची कोठारे, शाळा वगैरेही आहेत. हे संशोधन कार्य वीस वर्षे सुरू राहिले. 1985 मध्ये हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट झाले. शेकडो वर्षांपूर्वी याठिकाणी अतिशय शांतताप्रिय लोक राहत होते. ज्यावेळी तुर्क ओट्टोमन साम्राज्याच्या जुलमी शासकांनी आजुबाजूच्या प्रदेशांना नष्ट करण्यास सुरुवात केली त्यावेळी या शहरातील लोकांनी जीव वाचवण्यासाठी हे भूमिगत शहर तयार केले. ते नेमके कधी बांधले गेले याचा कार्यकाळ स्पष्ट नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news