Language Learning Techniques | व्याकरणातून नव्हे; आवाजातून लवकर शिकता येते भाषा

Language Learning Techniques |
Language Learning Techniques | व्याकरणातून नव्हे; आवाजातून लवकर शिकता येते भाषा
Published on: 
Updated on: 

लंडन : फ्रेंच, अरबी किंवा हंगेरियनसारखी एखादी नवीन परदेशी भाषा शिकताना शब्द पाठ करणे आणि व्याकरणाचे नियम घोकण्याऐवजी त्या भाषेतील आवाजांवर (ध्वनींवर) अधिक लक्ष केंद्रित करणे जास्त फायदेशीर ठरते, असा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि जपानमधील तोहोकू विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

सामान्यतः परदेशी भाषा शिकताना लोक ती आपल्या मातृभाषेच्या उच्चारांशी जोडून समजून घेण्याचा प्रयत्न करतात; मात्र अत्यंत कुशल भाषातज्ज्ञ परदेशी शब्दांना थेट शब्द म्हणून न स्वीकारता सुरुवातीला केवळ एक ‘आवाज’ किंवा ध्वनी म्हणून ऐकतात. संशोधकांनी इंग्रजी शिकणाऱ्या ६७ जपानी व्यक्तींच्या मेंदूचे ‘एफएमआरआय’ स्कॅन करून निरीक्षण केले. ज्या व्यक्तींची ध्वनीतील चढ-उतार, लांबी आणि सूर ओळखण्याची संवेदनशीलता अधिक होती, त्यांनी नवीन उच्चार अधिक वेगाने आत्मसात केले. त्यांच्या मेंदूवर मातृभाषेच्या आधीच्या भाषिक रचनेचा अडथळा आला नाही; उलट त्यांनी नवीन आवाजांवर अधिक तटस्थपणे प्रक्रिया केली.

शिक्षण पद्धती बदलण्याची गरज

यूसीएल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक काझुया सैतो-व्हॅन पोएट्रेन यांच्या मते, लोक भाषा शिकण्यात मागे पडण्याचे कारण त्यांची क्षमता नसून भाषेचा मर्यादित सराव आणि चुकीची शिक्षण पद्धती आहे. शाळांमध्ये केवळ पाठांतर आणि व्याकरणावर भर न देता विद्यार्थ्यांच्या ऐकण्याच्या कौशल्याला प्रशिक्षित केले पाहिजे. लँकेस्टर विद्यापीठाचे प्राध्यापक पॅड्रिक मोनाघन यांनीही या निष्कर्षाला दुजोरा देत सांगितले की, भाषेचे मूलभूत पैलू आत्मसात करण्यासाठी केवळ यांत्रिक सरावापेक्षा ध्वनी ऐकणे अधिक परिणामकारक ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news