

नवी दिल्ली ः 'मूड स्विंग' म्हणजे सतत मूड किंवा मनःस्थिती बदलत राहणे. एका क्षणी माणूस आनंदात असतो तर दुसर्या क्षणी लगेच त्याचा मूड बदलून तो रागावतो किंवा दुःखी होतो. अशा 'मूड स्विंग'ला एका जीवनसत्त्वाची कमतरता कारणीभूत असते. त्याचे नाव आहे 'ड' जीवनसत्त्व. हाडांमधील वेदना व मूड स्विंग या दोन अतिशय वेगवेगळ्या समस्या जरी असल्या तरी दोन्ही समस्यांचे मूळ या जीवनसत्त्वाची कमतरता हेच आहे!
'ड' जीवनसत्व अनेक गोष्टींसाठी आवश्यक असते. त्यामध्ये हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकारक क्षमता आणि मनःस्थिती यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 'ड' जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे सूर्यप्रकाश. विशेषतः कोवळ्या उन्हात आपले शरीर नैसर्गिकरित्याच या जीवनसत्त्वाची निर्मिती करीत असते. त्यामुळे सकाळच्या उन्हात किंवा दिवसभरातही काही वेळ सूर्यप्रकाशात घालवावा. आहारातूनही हे जीवनसत्त्व मिळू शकते. त्यामध्ये मत्स्याहार हा महत्वाचा आहे. विशेषतः साल्मन, ट्युना सारख्या फॅटी फिशमधून हे जीवनसत्व अधिक मिळते. याशिवाय मक्याचे तेल, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, सोया उत्पादने, टोमॅटो, हिरवे वाटाणे, मशरूम यामधूनही हे जीवनसत्त्व मिळते.