

कराची : गणेशोत्सव हा असा सण आहे जो जाती-धर्माच्या सीमा ओलांडून अत्यंत उत्साहाने आणि जोशात साजरा केला जातो. भारताच्या कानाकोपऱ्यात भव्य मंडप सजतात आणि दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागतात. पण ही धामधूम केवळ भारतातच मर्यादित राहिलेली नाही, तर शेजारील देश पाकिस्तानमध्येही पोहोचली आहे. तिथे राहणाऱ्या मराठी बांधवांनी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला आहे. कराचीतील ‘मराठी महिला मंडळा’ने याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन केले होते, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ अमर नावाच्या युवकाने बनवला आहे, जो स्वतः पाकिस्तानमध्ये राहणारा मराठी आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये महिला महाप्रसादाचे अन्न वाटताना दिसत आहेत. व्हिडिओवर ‘मराठी महिला मंडळ, कराची’ असे लिहिलेले दिसते. त्यानंतर अमर तिथल्या महिलांशी संवाद साधतो आणि त्या काय करत आहेत असे विचारतो. त्यावर एक महिला सांगते की, ‘‘मी महाप्रसाद तयार करत आहे.’’ कसला महाप्रसाद बनवला आहे असं विचारल्यावर, ‘‘सोयाबीन आणि बटाट्याची भाजी’’ असे उत्तर ती देते. पुढे आणखी एक महिला सांगते की, ‘‘आम्ही दरवर्षी येथे येतो, बाप्पाची स्थापना करतो आणि दरवर्षी ही सेवा करतो.’’ या व्हिडिओमध्ये इतरही अनेक महिला आनंदाने सहभागी झालेल्या दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून विशेषतः महाराष्ट्रातील लोक पाकिस्तानमधील मराठी बांधवांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. बहुतांश लोकांनी कमेंट्समध्ये ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले आहे.