न्यूयॉर्क : सध्याच्या जमान्यात नशीबवाला त्यालाच म्हणायचे, तो कमी मेहनतीत अधिक कमाई करू शकतो. तसे पाहिल्यास आजकाल पैसे मिळवणे जितके सोपे आहे, तितकेच कठीण सुद्धा! सोपे त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे ही कला आहे आणि अवघड त्यांच्यासाठी ज्यांना मार्केटिंग करता येत नाही! अमेरिकेतील एक महिला मात्र याबाबत खूपच नशीबवान आहे. कारण ती असे काम करते, ज्यात तिला फक्त बसून राहण्यासाठी दोन हजार रुपये मिळतात आणि तेही प्रत्येक तासाला!
द सन वेबसाईटने दिलेल्या एका वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये राहणारी कॅलिया डेनिस ही ती नशीबवान महिला आहे. कॅलिया ही मुलांची देखभाल करण्याचे काम करते. ज्या-ज्यावेळी पालकांना मुलांना घरी सोडून जावे लागते, त्यावेळी त्यांना आयांवर अवलंबून राहावे लागते. कॅलियासाठी उत्पन्नाचा हाच मुख्य स्रोत आहे. कॅलियाने सोशल मीडियावर आपली लाईफस्टाईल कशी आहे, याची माहिती दिली, जी रंजक आहे.
कॅलिया म्हणते की, तिला आलिशान घरांमध्ये राहायचे असते, ज्यात तिच्यासमोर फक्त श्रीमंतांची मुले असतात. ती दिवसातील बहुतांशी वेळ फक्त बसून असते आणि या आलिशान घरांमधून न्यूयॉर्कची श्रीमंती न्याहाळत राहते. इन्स्टाग्रामवर कॅलियाचे 23 हजारांच्या आसपास फॉलोअर्स असून ती सोमवार ते शुक्रवार या आठवड्यातील पाच दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत काम करते. कॅलिफोर्नियातील लोक कंजुष असतात; पण न्यूयॉर्कमध्ये उत्तम पैसे मिळतात. त्यामुळे सहा आकडी कमाई सहज होते, याचा ती अभिमानाने उल्लेख करते. आपणही तासाला किमान दोन हजार रुपये मिळवण्याचा एखादा मार्ग शोधण्यास काय हरकत आहे?