106 व्या वर्षी अवकाशातून घेतली उडी!

106 व्या वर्षी अवकाशातून घेतली उडी!

टेक्सास : जगात धाडसी लोकांची काही कमतरता नाही. लोक अनेक साहसी गोष्टी करताना पाहायला मिळतात. पण, अनेकदा जिथे तरुणदेखील काही साहसी उपक्रम टाळतात, तेथे काही वृद्ध मात्र तेच अगदी धाडसाने, साहसाने करतात. असेच एक उदाहरण टेक्सासमधील 106 वर्षीय अल्फ्रेड बॅश्चके यांचे आहे. वयाच्या 106 व्या वर्षी अल्फ्रेड यांनी स्कायडायव्हिंगचा आणखी एक विक्रम नोंदवला आहे.

या 106 वर्षीय आजोबांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. 106 वर्षीय अल्फ्रेड स्कायडायव्हिंग करण्यासाठी विमानात उभे आहेत. त्यांच्यासोबत बाकी लोकही आहेत. एक व्यक्ती त्यांना घेऊन उडी मारतो. कॅमेर्‍यात त्यांचा आनंद दिसत आहे. ते अजिबात घाबरले नसून, खूप उत्साही दिसत आहेत. त्यांनी ही स्कायडायव्हिंग करत गिनीज बुक रेकॉर्ड बनवला. 14 हजार फूट उंचावरून उडी मारत त्यांनी रेकॉर्ड बनवला, असे या व्हिडीओत दिसून येते.

दरम्यान, अल्फ्रेड यांनी सांगितले की, हे त्यांचे स्वप्न होते. मी इतकी वर्षे जगेन, असे वाटले नव्हते, असे ते याप्रसंगी म्हणाले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आश्चर्य म्हणजे अल्फ्रेड यांनी यापूर्वीही अनेकदा असे साहसी पराक्रम गाजवले आहेत. 2020 मध्ये वयाच्या 103 व्या वर्षी त्यांनी असेच साहसी स्कायडायव्हिंग केले होते. त्यावेळी त्यांच्या दोन्ही नातवंडांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याच्या आनंदात त्यांनी तो पराक्रम गाजवला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news