Iranian Men Height | इराणी पुरुषांच्या उंचीत जगात सर्वाधिक वाढ ब्रिटन-अमेरिका पडले मागे

Iranian Men Height |
Iranian Men Height | इराणी पुरुषांच्या उंचीत जगात सर्वाधिक वाढ ब्रिटन-अमेरिका पडले मागे File Photo
Published on
Updated on

लंडन : गेल्या शतकात इराणी पुरुषांच्या सरासरी उंचीत सुमारे १६.५ सेंटिमीटरची वाढ झाली आहे. ही वाढ केवळ काही पुरुषांपुरती मर्यादित नसून जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येमध्ये दिसून आली आहे. या शतकात (१८९६ ते १९९६ या १०० वर्षांच्या काळात) ब्रिटिश पुरुषांच्या उंचीत ११ सेंटिमीटर आणि अमेरिकन पुरुषांच्या उंचीत ६ सेंटिमीटरची वाढ झाली. त्यामुळे या शर्यतीत इराण सर्वात पुढे राहिला आहे. दुसरीकडे, महिलांच्या बाबतीत दक्षिण कोरियातील महिलांच्या उंचीत सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. याचा थेट संबंध उत्तम पोषण आणि चांगल्या राहणीमानाशी जोडला गेला आहे.

‘स्पेस डेली’ने दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांच्या उंचीबाबत ही माहिती २०१६ मधील एका संशोधन पत्रातून समोर आली आहे. हे संशोधन पत्र ‘A century of trends in adult human height’ (प्रौढ मानवाच्या उंचीतील एका शतकाचा ट्रेंड) या नावाने प्रसिद्ध झाले होते. ते ‘NCD रिस्क फॅक्टर कोलॅबोरेशन’ने ‘eLife’ जर्नलमध्ये प्रकाशित केले होते. इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी ‘जागतिक आरोग्य संघटना’ (WHO) सोबत मिळून या संशोधन टीमचे नेतृत्व केले होते. संशोधन टीमने १.८६ कोटींहून अधिक लोकांवर झालेल्या १,४७२ लोकसंख्या-आधारित अभ्यासांचे सखोल विश्लेषण केले.

या आधारे त्यांनी २००० ते १९९६ दरम्यान जगभरातील २०० देशांत जन्मलेल्या लोकांच्या सरासरी प्रौढ उंचीचा अंदाज लावला. यामध्ये इराणी पुरुषांच्या उंचीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले. २० व्या शतकात इराणी पुरुषांच्या उंचीत १६.५ सेंटिमीटरची वाढ झाली (ज्यात ९५ टक्के क्रेडिबल इंटरव्हल १३.३ ते १९.७ सेमी होते). महिलांच्या बाबतीत दक्षिण कोरियाच्या महिला अव्वल स्थानी राहिल्या, ज्यांच्या उंचीत २०.२ सेंटिमीटरची मोठी वाढ झाली. हे संशोधन उंचीतील बदल मोजते; परंतु त्याची थेट कारणे सांगत नाही. तरीही संशोधकांनी एकाच दिशेने इशारा केला आहे.

इम्पीरियल कॉलेजच्या पत्रकानुसार, ज्या मुलांना चांगले पोषण मिळते आणि जे चांगल्या वातावरणात वाढतात, त्यांची उंची जास्त वाढते. गरोदरपणाच्या काळात आईचे आरोग्य कसे आहे, हेदेखील अत्यंत महत्त्वाचे ठरते. इम्पीरियल कॉलेजचे प्राध्यापक माजिद एजाती यांनी या संपूर्ण प्रक्रियेला ‘हेल्थ पोर्ट्रेट’ (आरोग्याची प्रातिनिधिक प्रतिमा) म्हणून वर्णन केले. त्यांनी सांगितले की, हा अभ्यास आपल्याला गेल्या शतकातील विविध देशांच्या आरोग्याची एक स्पष्ट कल्पना देतो. काही देशांमध्ये सरासरी उंची कमी होत आहे, तर दुसऱ्या देशांमध्ये लोक अधिक उंच होत आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news