

तेहरान : आर्थिक दबाव, वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या गर्तेत अडकलेल्या इराणकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबतचा वाढता तणाव, अंतर्गत हिंसाचार आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतरची अस्थिरता यामुळे इराणची स्थिती नाजूक बनली आहे. इराणचे चलन ‘रियाल’ सातत्याने घसरत असतानाच, आता एका गोष्टीची चर्चा जोरात सुरू आहे, ती म्हणजे इराणचा ‘शाही खजिना’. इराणचा शाही खजिना हा जगातील सर्वात मोठ्या आणि महागड्या संग्रहांपैकी एक मानला जातो.
यामध्ये शेकडो वर्षे जुने मुकुट, हिरे, पाचू, मोती, सोन्याची सिंहासने आणि अनमोल दागिने आहेत. हा खजिना तेहरानमधील ‘नॅशनल ज्वेल्स ट्रेझरी’ मध्ये, सेंट्रल बँक ऑफ इराणच्या सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आला आहे. साधारण 500 वर्षांपूर्वी या खजिन्याची जमवाजमव सुरू झाली होती. या खजिन्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘दर्या-ए-नूर’ (रोशनीचा समुद्र) हा हिरा. हा 182 कॅरेटचा गुलाबी हिरा असून, जगातील सर्वात मोठ्या पिंक डायमंडस्पैकी एक आहे. इतिहासकारांनुसार, हा हिरा एकेकाळी भारतातील मुघल खजिन्याचा भाग होता.
1739 मध्ये जेव्हा इराणी शासक नादिर शाह याने दिल्लीवर आक्रमण केले, तेव्हा तो अनेक मौल्यवान वस्तूसह हा हिराही इराणला घेऊन गेला. या रत्नांचा कधीही खुल्या बाजारात लिलाव झालेला नसल्याने त्यांची अचूक किंमत सांगणे कठीण आहे. तरीही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, या खजिन्याची किंमत 20 अब्ज डॉलर ते 50 अब्ज डॉलर (सुमारे 4 लाख कोटी रुपये) दरम्यान असू शकते. नादिर शाहने भारतातून जात असताना मुघल बादशाह शाहजहान याचे प्रसिद्ध मयूर सिंहासनही आपल्यासोबत नेले होते.
1937 मध्ये इराणचे शासक रेझा शाह पहलवी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी हा खजिना राजवाड्यातून काढून सरकारी बँकेच्या ताब्यात दिला. तेव्हापासून हे दागिने राजाची वैयक्तिक मालमत्ता न राहता देशाची ‘राष्ट्रीय संपत्ती’ बनले. आजही हे दागिने सेंट्रल बँक ऑफ इराणच्या बॅलन्स शीटमध्ये ‘नॅशनल रिझर्व्ह’ म्हणून नोंदवलेले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये शाही दागिने केवळ संग्रहालयात ठेवले जातात. मात्र, इराणमध्ये या खजिन्याकडे देशाच्या आर्थिक ताकदीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. तज्ज्ञांच्या मते, या रत्नांमुळे थेट चलनाची किंमत ठरत नसली, तरी देशाच्या संपत्तीवरचा लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी हा खजिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.