

लंडन : वैद्यकीय क्षेत्रात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. युनायटेड किंगडममधील एका 40 वर्षीय महिलेसोबत घडलेली एक घटना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका ‘अद़ृश्य आवाजाने’ ( Auditory Hallucination) केवळ तिचे मार्गदर्शनच केले नाही, तर तिच्या मेंदूतील जीवघेण्या ट्यूमरचे निदान करण्यासही मदत केली.
एके दिवशी ही महिला घरी वाचन करत असताना तिला अचानक एक अनोळखी आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणाला, ‘कृपया घाबरू नकोस. अशा प्रकारे माझा आवाज ऐकून तुला धक्का बसला असेल, पण तुझ्याशी संपर्क साधण्याचा हा सर्वात सोपा मार्ग होता. मी आणि माझा मित्र पूर्वी ग्रेट ऑरमंड स्ट्रीट येथील चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये काम करत होतो आणि आम्हाला तुला मदत करायची आहे.’ सुरुवातीला त्या महिलेला वाटले की तिला मानसिक आजार झाला आहे. तो अद़ृश्य आवाज तिच्याशी संवाद साधत होता.
आपली सत्यता पटवून देण्यासाठी त्या आवाजाने महिलेला अशा तीन गोष्टी सांगितल्या, ज्या तिला माहीत नव्हत्या. महिलेने पडताळणी केली असता त्या गोष्टी अगदी अचूक निघाल्या. घाबरलेल्या महिलेने मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली. डॉक्टरांनी तिला ‘फंक्शनल हॅल्युसिनेटरी सायकॉसिस’ (वास्तविक जगाशी संपर्क तुटणे) नावाचा आजार असल्याचे निदान केले आणि तिला ‘थायोरिडाझिन’ हे औषध सुरू केले. काही काळानंतर तो आवाज येणे बंद झाले. काही दिवसांनी ती महिला सुट्टीवर गेली असताना तिला पुन्हा तोच आवाज ऐकू आला.
यावेळी त्या आवाजाने तिला तातडीने घरी परतण्यास आणि मेंदूची तपासणी करण्यास सांगितले. त्या आवाजाने तिला एका विशिष्ट रुग्णालयाचा पत्ताही दिला आणि सांगितले की, ‘तुझ्या मेंदूमध्ये ट्यूमर आहे, त्वरित स्कॅन करून घे.’ जेव्हा महिलेने ही गोष्ट आपल्या मानसोपचार तज्ज्ञांना सांगितली, तेव्हा त्यांनी केवळ तिचे समाधान करण्यासाठी स्कॅनची शिफारस केली. सुरुवातीला रुग्णालयाने हा खर्चिक स्कॅन करण्यास नकार दिला, कारण त्याचे कोणतेही ठोस वैद्यकीय कारण दिसत नव्हते. मात्र, स्कॅन झाल्यानंतर सर्वच थक्क झाले. स्कॅनमध्ये महिलेच्या मेंदूच्या दोन भागांच्या मध्ये ‘पॅराफाल्सीन मेनिंगिओमा’ (झरीरषरश्रलळपश चशपळपसळेार) नावाचा ट्यूमर असल्याचे दिसून आले. हा ट्यूमर 6.4 सेमी लांब आणि 3.8 सेमी रुंद होता.
डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून तो ट्यूमर बाहेर काढला. विशेष म्हणजे, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्या आवाजाने महिलेला शेवटचा निरोप दिला. तो आवाज म्हणाला, ‘आम्हाला तुझी मदत करून आनंद झाला. निरोप घेतो.‘ शस्त्रक्रियेनंतर महिलेची औषधे बंद करण्यात आली आणि तिला पुन्हा कधीही तो आवाज ऐकू आला नाही. या घटनेला 12 वर्षे उलटून गेल्यानंतरही ती महिला पूर्णपणे निरोगी आहे. मेंदूतील गाठींमुळे अनेकदा भ—म किंवा आवाज ऐकू येण्याच्या समस्या उद्भवू शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, या केसमध्ये त्या ‘आवाजाने’ दिलेली अचूक माहिती आजही एक रहस्य मानले जाते.
हॉलीवूडची ऑस्कर विजेती अभिनेत्री, नर्तकी आणि योग साधना करणारी एक साधिका असलेल्या शर्ली मॅकलेन यांनीही त्यांच्या एका पुस्तकात आपल्याला अशरीरी, अद़ृश्य आवाजाकडून मार्गदर्शन मिळत होते असे म्हटलेले आहे. त्यांची ‘डान्सिंग इन द लाईट’ सारखी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.