

Friendship Day Original Concept
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार उजाडताच तरुणाईमध्ये मैत्रीचे धागे (फ्रेंडशिप बँड) बांधण्याची आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्याची लगबग सुरू होते. हा दिवस म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’. पण या दिवसाची सुरुवात केवळ मैत्रीचे धागे बांधण्यापुरती मर्यादित नव्हती, तर यामागे एक रंजक आणि तितकाच महत्त्वाचा इतिहास दडलेला आहे. एका व्यावसायिक कल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक स्तरावर मानवी नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस बनला आहे.
सुरुवातीची व्यापारी संकल्पना
‘फ्रेंडशिप डे’ची मूळ संकल्पना 1930 मध्ये हॉलमार्क कार्डस्चे संस्थापक जॉयस हॉल यांनी मांडली होती. लोकांच्या मनात एकमेकांबद्दल मैत्रीची भावना वाढावी आणि त्यांनी एकमेकांना शुभेच्छापत्रे पाठवून हा दिवस साजरा करावा, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, केवळ शुभेच्छापत्रे विकण्यासाठी ही एक व्यापारी खेळी आहे, असे लोकांना वाटल्याने त्यांची ही कल्पना फारशी यशस्वी झाली नाही आणि काही काळातच अमेरिकेत या दिवसाचे महत्त्व कमी झाले.
मैत्रीचा जागतिक स्तरावरील पाया
‘फ्रेंडशिप डे’च्या खर्या अर्थाने जागतिक पायाभरणीचे श्रेय पॅराग्वेचे डॉ. रॅमन आर्टेमियो बाचो यांना जाते. 1958 मध्ये, त्यांनी ‘वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड’ या संस्थेची स्थापना केली. वंश, वर्ण, धर्म किंवा भाषा यांसारख्या कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांमध्ये मैत्रीची भावना वाढवून जगात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या या मोहिमेला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक देशांमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
संयुक्त राष्ट्रांची अधिकृत घोषणा आणि तारखेतील फरक
मैत्रीचे जागतिक महत्त्व ओळखून, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 27 एप्रिल 2011 रोजी एक ठराव मंजूर केला आणि 30 जुलै हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय फ्रेेंडशिप डे’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केला. संयुक्त राष्ट्रांनुसार, हा दिवस साजरा करण्यामागे लोकांमध्ये, देशांमध्ये आणि विविध संस्कृतींमध्ये मैत्रीचे पूल बांधून शांततेच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. तरीही भारत, बांगला देश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच साजरा केला जातो. यामागे संयुक्त राष्ट्रांच्या घोषणेपूर्वीच या देशांमध्ये ही परंपरा रुजलेली असणे, हे प्रमुख कारण मानले जाते.