

नवी दिल्ली : बॉलीवूड चित्रपटांमधील हेरांच्या कथा रोमांचक आणि देशभक्तीने प्रेरित वाटत असल्या, तरी प्रत्यक्षात हेरगिरीचे जग अत्यंत धोकादायक आणि वेदनादायी असते. सध्या ‘धुरंधर’ चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच, भारताचे खरे ‘ब्लैक टायगर’ म्हणून ओळखल्या जाणार्या रवींद्र कौशिक यांची कथा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. त्यांना देशातील सर्वात धाडसी, पण दुर्लक्षित राहिलेल्या गुप्तहेरांपैकी एक मानले जाते.
राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जन्मलेल्या रवींद्र कौशिक यांची निवड त्यांच्या अभिनयातील कौशल्यामुळे ‘रॉ’मध्ये झाली होती. कडक प्रशिक्षणानंतर त्यांना पाकिस्तानात पाठवण्यात आले. तिथे त्यांनी ‘नबी अहमद शाकिर’ हे नाव धारण करून पाकिस्तानच्या सैन्यात प्रवेश मिळवला आणि चक्क ‘मेजर’ पदापर्यंत मजल मारली. 1979 ते 1983 या काळात त्यांनी भारताला अत्यंत महत्त्वाची गुप्त माहिती पुरवली, ज्यामुळे देशाला धोरणात्मक आघाडी मिळाली. मात्र, एका लहानशा चुकीने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. 1983 मध्ये पकडले गेल्यानंतर त्यांना अमानवीय यातनांना सामोरे जावे लागले. सुमारे दोन दशके तुरुंगवास भोगल्यानंतर 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना एका अज्ञात थडग्यात दफन करण्यात आले.
रवींद्र कौशिक यांची कथा हे आठवण करून देते की, देशाच्या सुरक्षेसाठी काम करणारे अनेक नायक असेही आहेत, ज्यांना कधीच ओळख मिळत नाही. त्यांचे हे हौतात्म्य आजही प्रश्न उपस्थित करते की, अशा गुमनाम नायकांना त्यांचा हक्क आणि सन्मान खरोखर मिळतो का? 1975 मध्ये कौशिक ‘नबी अहमद शाकिर’ नावाने पाकिस्तानात पोहोचले. तिथे त्यांनी कराची विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि हळूहळू पाकिस्तानी सैन्यात भरती झाले. स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर ते मेजर पदापर्यंत पोहोचले. 1979-83 दरम्यान त्यांनी भारताला अनेक लष्करी आणि धोरणात्मक माहिती पाठवली. 1983 मध्ये एका ज्युनिअर एजंटच्या चुकीमुळे कौशिक यांची खरी ओळख उघड झाली आणि त्यांना अटक करण्यात आली. 1985 मध्ये पाकिस्तानी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, जिचे नंतर जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले. सुमारे 20 वर्षे तुरुंगात नरकयातना भोगत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला अनेक भावुक पत्रे लिहिली. एका पत्रात त्यांनी वेदनेने विचारले होते, ‘देशासाठी बलिदान देणार्यांच्या नशिबी हेच येते का?’ 21 नोव्हेंबर 2001 रोजी मियानवाली तुरुंगात आजारपण आणि उपेक्षेमुळे त्यांचा मृत्यू झाला. तुरुंगाच्या मागेच त्यांचे कोणत्याही ओळखीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले.