जयपूर : 'जगातील सर्वात लांब भिंत' अशी चीनमधील 'द ग्रेट वॉल'ची ख्याती आहे. चीनमधील ही भिंत आपली लांबी, स्थापत्य आणि मजबुतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत आपल्या भारतातच आहे हे अनेकांना ठाऊक नसते. अशी भिंत राजस्थानच्या कुंभलगढ किल्ल्यापासून बांधलेली आहे.
राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ल्याची भिंत ही चीनच्या भिंतीनंतर जगातील दुसरी सर्वात मजबूत आणि लांब भिंत आहे. साधारणपणे 36 किलोमीटर लांबीची ही भिंत अभेद्यच राहिली. समुद्रसपाटीपासून 1914 मीटर उंचीवर, अरावली पर्वतराजीत ही भिंत बांधलेली आहे. या भिंतीची रुंदी 15 मीटर आहे.
कुंभलगढ किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी सात दरवाजे तयार केलेले आहेत. या किल्ल्याच्या आत अनेक मंदिरांचा समूह आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूने रात्री मशाली पेटवल्या जातात. त्यामुळे हा किल्ला रात्री उजळून निघतो. येथील भिंत आजही मजबूत असून तिचे सौंदर्य कायम आहे. हा किल्ला आणि भिंत पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.