लंडन : ब्रिटनमधील बाजारांमधून काकडी, मिरची, टोमॅटो यांसारख्या भाज्या गायब होऊ लागल्या आहेत. आता तर स्थिती इतकी बिघडली आहे की, ब्रिटिश सुपर स्टोअर्समध्ये एका काकडीची किंमत तब्बल 42 रुपयांवर पोहोचली आहे.
तसे पाहिल्यास ब्रिटनमध्ये काकडीचे पीक हे उष्ण जलवायूमध्ये घेतले जाते. यासाठी खास प्रकारची 'ग्लास हाऊस' तयार केली जातात. ही घरे उष्ण ठेवण्यासाठी प्रामुख्याने नैसर्गिक वायूचा वापर केला जातो. मात्र, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे ब्रिटनमध्ये गॅसच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. यामुळे प्रचंड दराने गॅस खरेदी करून काकडीचे उत्पादन घेण्यास ब्रिटनमधील ग्लास हाऊसचे मालक असमर्थ ठरू लागले आहेत.
ब्रिटनमध्ये गेल्या वर्षीच्या अखेरपासूनच गॅसच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ग्लास हाऊस शेती करणारे शेतकरी गॅसच्या वाढत्या किमतीमुळे काकडी, मिरची, टोमॅटो, वांगी या भाज्यांचे उत्पादन घेणे टाळत आहेत. यामुळेच ब्रिटनमध्ये सध्या भाज्यांची टंचाई जाणवत असून, त्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. यामुळेच तेथील शेतकर्यांनी भाज्यांचे उत्पादन घेण्याकडे पाठ फिरविली आहे. परिणामी ब्रिटनमधील सुपर मार्केटमध्ये एक काकडी 42 रुपयांना विकली जात आहे. अशीच स्थिती दुसर्या भाज्यांचीही आहे.
हेही वाचा