

रिओ डी जनैरो : कधी कधी अत्यंत अनपेक्षित अशा घटना घडत असतात. अशीच एक घटना अमेझॉनच्या वर्षावनात घडली आहे. तिथे एका नदीतील पाणी आटल्यावर आत चक्क मानवी चेहरे दिसून आले, अर्थात दगडांवर कोरलेले! पाण्याखाली गेलेल्या निग्रो नदीच्या खडकांवर हे चेहरे दिसून आले आहेत.
रियो निग्रो आणि अॅमेझॉनचा जिथे संगम होतो त्या ब्राझीलच्या मनौसजवळ नदीच्या तळाशी हे प्राचीन चेहर्यांचे ठसे सापडले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे पेट्रोग्लिक आहेत म्हणजेच कातळशिल्प. आपल्या भारतातही अशी अनेक कातळशिल्प आहेत. एन्शिएन्ट ओरिजन्सच्या अहवालानुसार, अलीकडेच ब्राझीलमध्ये कातळशिल्प सापडल्याची ही दुसरी घटना आहे. तज्ज्ञांच्या मते हे कोरीवकाम कुर्हाडीने केले असावेत. ज्याचा आकार चौरसाकृती आहे.
या आकृत्यांमध्ये आपण नीट पाहू शकता की डोळे आणि तोंड आहे परंतु नाक नाही. याला कॉम्प्लेक्स ग्राफिक आर्ट असं म्हणतात. यात आनंदी आणि दु:खी चेहरेही आहेत. असेही कळते की ही चेहरे शिकारी असावेत. या नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यावर हे कातळशिल्प पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन नदीची निग्रो नदी ही एक उपनदी आहे. तिचा उगम हा कोलंबियामध्ये होतो. व्हेनेझुएला आणि नंतर ती ब्राझील येथील अॅमेझॉनमधून वाहते. या नदीचे मुख हे मनौस शहरात आहेत आणि याच शहराच्या तळाशी हे अवशेष सापडले आहे.