Hitler's Death | हिटलरच्या मृत्यूनंतर त्याच्या दहशतीचे रशियाने केले होते भांडवल

दंतवैद्यकीय अवशेषांवरून ओळख पटली होती; मात्र स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली मृत्यूचे पुरावे दडवले
Hitler's Death |
Hitler's Death | हिटलरच्या मृत्यूनंतर त्याच्या दहशतीचे रशियाने केले होते भांडवल
Published on: 
Updated on: 

बर्लिन : दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अ‍ॅडॉल्फ हिटलरचा मृत्यू झाल्याचे ठोस पुरावे सोव्हिएत संघाच्‍या (तेव्‍हाचा सोव्हिएत रशिया) तपास यंत्रणांकडे होते. त्याच्या दातांच्या अवशेषांची ओळख दंतवैद्यकीय सहायक कॅथे हॉयझरमन आणि तंत्रज्ञ फ्रिट्झ एच्टमन यांनी पटवली होती, तरीही सोव्हिएत रशियाच्‍या नेतृत्वाने हे पुरावे जगासमोर आणण्याऐवजी हिटलर जिवंत असण्याची शक्यता व्यक्त करून संभ्रम निर्माण केला. युद्धोत्तर राजकीय समीकरणे आणि प्रचारनीती हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे इतिहासकारांचे विश्लेषण आहे.

बंकरमध्ये आत्महत्या; मृतदेह जाळले

३० एप्रिल १९४५ रोजी बर्लिनमधील भूमिगत फ्युहरर बंकरमध्ये हिटलर आणि त्याची पत्नी ईव्हा ब्राऊन यांनी आत्महत्या केली. त्यानंतर दोघांचे मृतदेह बंकरबाहेरील बागेत नेऊन पेट्रोल ओतून जाळण्यात आले. सोव्हिएत रशियाच्‍या सैन्याने बर्लिनचा ताबा घेतल्यानंतर 'स्मेर्श' या लष्करी प्रतिगुप्तचर संघटनेने तपास सुरू केला. जळालेले अवशेष आणि दातांचे भाग तपासण्यात आले. हिटलरच्या दातांवरील वैशिष्ट्यपूर्ण उपचारांमुळे त्याची ओळख पटवणे शक्य झाले.

मृत्यूबाबत जाणीवपूर्वक संभ्रम?

तपासात पुरावे मिळूनही ९ जून १९४५ रोजी सोव्हिएत रशियाचे मार्शल जॉर्जी झुकोव्ह यांनी हिटलरचा मृतदेह ओळखण्यात आलेला नसल्याचे सांगितले. तो स्पेनमध्ये पळून गेला असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. ब्रिटन आणि अमेरिकेला त्यामुळे स्वतंत्र तपास करावा लागला. ब्रिटिश इतिहासकार ह्यू ट्रेव्हर-रोपर यांनी साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध माहितीच्या आधारे १ नोव्हेंबर १९४५ रोजी हिटलरने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मांडला. इतिहासकारांच्या मते, हिटलर जिवंत असल्याचा संशय कायम ठेवल्याने इतर देशांवर प्रश्नचिन्ह निर्माण करता येत होते. युद्धानंतर युरोपच्या भवितव्यावरून सोव्हिएत रशिया आणि पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांमध्ये तणाव वाढत होता. अशा स्थितीत नाझी धोका अद्याप संपलेला नसल्याचा युक्तिवाद सोव्हिएत संघासाठी राजकीयदृष्ट्या उपयुक्त ठरू शकत होता.

१९६८ मध्ये पुरावे प्रसिद्ध

मे १९४६ मध्ये सोव्हिएत रशियाच्‍या तपासकर्त्यांना बंकर परिसरात कवटीचे तुकडेही मिळाले; मात्र ही माहिती गुप्त ठेवण्यात आली. १९५६ मध्ये जर्मनीतील न्यायालयीन प्रक्रियेनंतर हिटलरला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर १९६८ मध्ये सोव्हिएत पत्रकार लेव्ह बेझिमेन्स्की यांनी शवविच्छेदन अहवालासह काही कागदपत्रे प्रसिद्ध केली. या अहवालात हिटलरचा मृत्यू सायनाईड विषामुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता, तर पाश्चिमात्य तपासात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला होता. सोव्हिएत पुस्तकाचा सूर प्रचारकी असल्याचे इतिहासकार कॅरोलिन शार्पल्स यांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.