

सिडनी : जगभरात शेकडो प्रकारच्या सापांच्या प्रजाती आढळतात. यापैकी काही साप अत्यंत विषारी असतात, तर बहुतेक साप विषारी नसतात. कोब्रा, रसेल वायपर, क्रेट आणि सॉ स्केल्ड वायपर या चार सापांच्या प्रजाती सर्वाधिक विषारी मानल्या जातात. या सापांच्या दंशानंतर वेळीच उपचार झाले नाहीत तर जीवावर बेतू शकते.
सापांबद्दल अनेक दंतकथा आणि समजुती प्रचलित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे साप किती प्रमाणात विष तयार करू शकतात आणि मनुष्याला चावल्यावर ते किती विष सोडतात याबद्दलची माहिती. अनेक लोकांचा असा समज आहे की, सापांकडे अमर्यादित प्रमाणात विष साठा असतो. मात्र, सर्पतज्ज्ञ याबद्दल वेगळे मत व्यक्त करतात. कोब्रा प्रजातीचे विषारी साप दररोज सरासरी 100-200 मिलिग्रॅम विष तयार करतात. रसेल वायपरप्रजातीचे साप दररोज सरासरी 50-100 मिलिग्रॅम विष तयार करतात. क्रेट प्रजातीचे साप दररोज सुमारे 10-15 मिलिग्रॅम विष तयार करतात. सॉ स्केल्ड वायपर प्रजातीचे साप दररोज सरासरी 5-10 मिलिग्रॅम विष तयार करतात. मात्र, विशिष्ट परिस्थितीत हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. साप मनुष्याला चावताना विष सोडतात. विषाचं प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की सापाची प्रजाती, त्याचा आकार आणि चाव्याची तीव्रता.
कोब्रा एका चाव्यात सरासरी 5-30 मिलिग्रॅम विष सोडतो. हे विष स्नायूंच्या कार्यावर परिणाम करते आणि वेळेवर उपचार झाले नाहीत तर ते प्राणघातक ठरू शकते. रसेल वायपर एका चाव्यात 15-20 मिलिग्रॅम विष सोडतो. हे विष रक्ताभिसरण प्रणाली आणि ऊतींवर परिणाम करते, ज्यामुळे तीव्र सूज आणि रक्तस्राव होतो. क्रेट एका चाव्यात 5-7 मिलिग्रॅम विष सोडतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे दात छोटे असतात. हे विष स्नायूंवर परिणाम करते आणि अत्यंत घातक ठरू शकते.