बापरे..! शहरवस्तीत आढळले 784 साप

बापरे..! शहरवस्तीत आढळले 784 साप
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पावसाचे पाणी बिळामध्ये शिरल्याने सापांचा बाहेर वावर वाढला असून, शहरातील वस्तीत सुमारे 784 साप आढळले आहेत. वाईल्ड अ‍ॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या स्वयंसेवकांनी अनेक वन्यजीव आणि पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम केले आहे.
अनेक वन्यजीव, पक्ष्यांना जीवदान
पावसाळा हा सापांच्या प्रजननाचा कालावधी असतो. हे वातावरण सापांना पोषक असल्याने अनेक ठिकाणी सापांचा वावर तसेच त्यांची पिलेदेखील आढळतात. जमिनीखाली बिळांमध्ये, खडकाच्या कपारीत सापांचा रहिवास असतो. पावसाळ्याच्या दिवसात यामध्ये पाणी शिरल्याने साप ऊबदार जागेच्या शोधात मनुष्यवस्तीत येतात. वाईल्ड अ‍ॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या स्वयंसेवकांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील रहिवाशी भागातून सुमारे 784 साप तसेच काही वन्यजीव आणि पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम केले.

यंदा जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. पावसाचा मानवाबरोबरच प्राण्यांवरही परिणाम होत आहे. ज्याप्रमाणे मनुष्य थंडाव्यापासून बचाव करण्याकरिता ऊब मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच प्राणीदेखील ऊबदार जागेच्या ठिकाणी भटकत असतात. त्यामुळे सापांचे मनुष्यवस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे.

उन्हाळ्यामध्ये जमिनीखाली बिळात, दगडाखाली राहणारे प्राणी हे जमीन ओलसर झाल्यानंतर बाहेर पडायला लागतात. बाहेर पडल्यानंतर ऊबदार ठिकाणी राहतात. शहरी भागात नाल्याच्या ठिकाणी सापांचे अस्तित्व असते. गटारांत फेकलेले खराब अन्न, खरकटे हे खाण्यासाठी उंदीर व घूस येतात.

नाल्याच्या व लोकवस्तीमध्ये गटारांजवळ असणारे उंदीर, घूस व बेडूक हे सापांचे अन्न असल्याने या अन्नाच्या शोधात साप लोकवस्तीमध्ये येतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरात सर्पमित्रांना साप पकडण्यासाठी कॉलचे प्रमाण वाढत आहे. सर्पमित्रांव्दारे शाळा, कॉलेज, सोसायटी, कंपन्या तसेच गावोगावी जाऊन सापांविषयी समाज प्रबोधन करण्यात येते.

प्रबोधन करताना लोकांना साप तसेच इतर वन्यजीवांची निसर्गाच्या अन्नसाखळीतील भूमिका समजावून सांगितली जाते, तसेच लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून सापांची उपयुक्तता स्पष्ट करण्यात येते.

इतके आढळले साप व प्राणी
नाग 143, घोणस 152 , मण्यार 74, फुरसे 17 हे विषारी तसेच 98 धामण, 27 धूळ नागीण, 107 तस्कर 21 गवत्या, 15 हरणटोळ, 13 डुरक्याघोणस, 76 दिवड, 27 कवड्या आणि 14 कुकरी या बिनविषारी सापांचा समावेश आहे. यात विषारी 386 तर बिनविषारी 398 सापांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त संस्थेद्वारे 19 घार, 21 पारवे, 3 कोकिळा, 9 कावळे, 13 पोपट, 1 राखी धनेश, 2 लांडोर, 1 युरेशियन स्टॉर्क यांसारख्या जखमी पक्षांना आणि 2 घोरपड, 2 कमेलियन सरडे , 2 मुंगूस, 3 खारुताई , 3 वटवाघळे 1 सॉफ्टशेल जातीचे कासव वाचवण्यात यश आले आहे. पैकी एक घोरपड एका राहत्या घरातून जप्त केली.

साप चावल्यास काय करावे?
साप चावल्यानंतर व्यक्ती ही घाबरलेली असते. अशावेळी घाबरून कित्येक व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, असे सर्पमित्र त्यांना आलेल्या अनुभवावरून सांगतात. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्ती प्रथम धीर द्यावा त्याला घाबरवू नये. त्वरित व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात न्यावे. पिंपरी चिंचवड शहरात वायसीएम रुग्णालयात सर्पदंशावर उपचार केले जातात. साप चावल्याची घटना घडल्यास ताबडतोब सर्पमित्रांशी संपर्क करावा. कारण साप त्याच ठिकाणी आढळल्यास कोणत्या जातीचा साप आहे हे कळल्यानंतर कोणत्या पद्धतीचे उपचार करावे हे समजते.

साप पकडण्यासाठी आम्हाला दिवसातून तीन ते चार कॉल येतात. जास्त करून तस्कर व धामण हे बिनविषारी साप तसेच नाग आणि घोणस हे विषारी मोठ्या प्रमाणात आहेत. सापांचा प्रजनन काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिले आढळतात. घोणस, नाग यांची पिले 20 ते 30 च्या घरात असतात. ती पकडण्यासाठी सात ते आठ दिवस लागले.
       – गणेश भूतकर, कार्याध्यक्ष, वाईल्ड अ‍ॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी 

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news