Andes Mountains | अँडीज पर्वतातील गोठवणाऱ्या शिखरांवर उंदीर कसे जिवंत राहतात?

 Andes Mountains |
Andes Mountains | अँडीज पर्वतातील गोठवणाऱ्या शिखरांवर उंदीर कसे जिवंत राहतात?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अँडीज पर्वतरांगेतील बर्फाच्छादित आणि शांत असलेल्या ज्वालामुखींच्या अतिउंच शिखरांवर उंदीर कसे तग धरून राहतात, याचा शोध वैज्ञानिकांनी लावला आहे. जगात मानवी वस्ती असलेल्या सर्वात उंच ठिकाणापेक्षाही तब्बल १.६ किलोमीटर (१ मैल) अधिक उंचीवर हे उंदीर वास्तव्यास आहेत. येथील हवा अतिशय विरळ आहे, तापमान गोठवणारे आहे आणि रखरखत्या वाळवंटी हवामानामुळे अन्न व पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का-लिंकन येथील जीवशास्त्राचे प्राध्यापक जे स्टोर्झ यांनी सांगितले, ‘‘एक गिर्यारोहक म्हणून या शिखरांवर उभे राहताना, अशा वैराण आणि प्रतिकूल वातावरणात एखादा प्राणी राहू शकतो ही कल्पनाच थक्क करणारी आहे.’’ २०२० मध्ये, प्रा. स्टोर्झ यांच्या नेतृत्वाखालील गिर्यारोहक वैज्ञानिकांच्या एका पथकाने अर्जेंटिना आणि चिलीच्या सीमेवर असलेल्या 'लुल्लैलाको' या शांत ज्वालामुखीच्या शिखरावर 'अँडियन लीफ-इअर्ड' प्रजातीच्या उंदरांची नोंद केली होती. समुद्रसपाटीपासून तब्बल २२,११० फूट (६,७३९ मीटर) या विक्रमी उंचीवर हे उंदीर आढळून आले होते. 'सायन्स' या जगप्रसिद्ध नियतकालिकात ९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनातून या उंदरांच्या आश्चर्यकारक जीवनशैलीमागची जैविक गुपिते समोर आली आहेत.

या उंचीवर जिवंत राहण्यासाठी या प्रजातीमध्ये अनेक शारीरिक आणि जैविक बदल घडून आले आहेत. एरवी अत्यंत विषारी ठरणाऱ्या वनस्पती सहज पचवण्याची क्षमताही या उंदरांमध्ये विकसित झाली आहे. या शोधापूर्वी, सस्तन प्राणी समुद्रसपाटीपासून जास्तीत जास्त १८,००० फूट (५,५०० मीटर) उंचीपर्यंतच जिवंत राहू शकतात असा संशोधकांचा समज होता. मात्र, या चवताळलेल्या हवामानाचा सामना करणाऱ्या चिमुकल्या प्राण्यांनी हा समज पूर्णपणे मोडीत काढला आहे. प्रा. स्टोर्झ यांनी पुढे सांगितले, ‘‘या प्रजातीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती उत्तर चिलीच्या वाळवंटी किनारपट्टीवरील समुद्रसपाटीपासून ते थेट अँडीज पर्वताच्या सर्वोच्च शिखरांपर्यंत कोणत्याही उंचीवर सहज जगू शकते.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news