

कॅलिफोर्निया : भारतात मागील बर्याच कालावधीपासून उकाड्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. भारताप्रमाणेच अन्य काही देशांनाही या उष्णतेची झळ सोसावी लागत आहे. मात्र, जगाच्या नकाशावर एक ठिकाण असेही आहे, जिथे उन्हाळ्यातील तापमान नेहमी 50 अंशांपेक्षाही अधिक असते आणि तरीही तेथे लोक राहतात.
यंदा माली या पश्चिम आफ्रिकी देशात तर रात्रीचे तापमान 48 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. सर्वोच्च उष्णतेचा विक्रम मात्र अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे डेथ व्हॅली या नावाने ओळखल्या जाणार्या ठिकाणी नोंदवला गेला आहे. जगातील सर्वात उष्ण ठिकाण, अशी या डेथ व्हॅलीची ओळख आहे. 1913 मध्ये या ठिकाणी येथील तापमान 56.7 अंश सेल्सिअसवर गेले होते. 2013 मध्ये 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
डेथ व्हॅलीमध्ये काही मिनिटं थांबण्यासाठी शरीरावर सतत पाणी ओतून घ्यावे लागते, यावरून तिथे किती उष्णता असेल, याचा अंदाज येईल. तिथे साध्या चप्पल-बुटांचे सोल निघून जातात. उन्हाळ्यात सकाळी 10 नंतर घराबाहेर पडण्यास मनाई असते.
डेथ व्हॅलीमध्ये टिंबिशा जमातीचे लोक राहतात. त्यांना पॅनामिंट शोशोन या नावाने ओळखले जात होते. डेथ व्हॅली समुद्रसपाटीपासून 86 मीटर खोल आहे. थंडीमध्ये या ठिकाणी तापमान शून्यापेक्षा खाली जाते. नॅशनल पार्क सर्व्हिसच्या एका रिपोर्टनुसार, त्या भागात पाणी कुठे लागेल व खाण्यायोग्य वनस्पती कुठे उगवू शकतात, हे टिंबिशा जमातीचे लोक बरोबर ओळखतात. जंगली मेंढ्या, ससे आणि इतर प्राण्यांच्या सवयी त्यांना माहीत आहेत. त्या नैसर्गिक संकेतांनुसार ते आपले जीवन ठरवतात. त्यामुळे ते लोक या भागात इतकी वर्षं राहू शकले.