मनिला : जगभरात वेगवेगळ्या रंग-रूपाच्या अनोख्या इमारती पाहायला मिळतात. कुठे बुटाच्या रूपाची इमारत आहे तर कुठे बास्केटच्या. कुठे पियानोच्या रूपातील इमारत आहे तर कुठे चक्क उडत्या तबकडीच्या. फिलिपाईन्समध्ये आता अशीच एक अनोखी इमारत उभी राहिलेली आहे. एका हॉटेलची ही इमारत चक्क कोंबड्याच्या रूपातील आहे!
आपल्यापैकी अनेकांना चिकन खायला आवडत असेल. पण विचार करा, याच चिकनमध्ये एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे असं कुणी म्हटलं तर तुम्ही काय कराल? अर्थातच तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण होय, हे खरं आहे. एका कोंबड्याच्या शरीरात भलं मोठं हॉटेल तयार करण्यात आलंय. अजूनही विश्वास बसत नाहीये? तर मग हे व्हायरल होणारे फोटो एकदा पाहाच. हे फोटो पाहून खरंच तुम्हीदेखील दंगच व्हाल. तुमचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. अर्थात हा कोंबडा काही खराखुरा नाहीये, तर कोंबड्याच्या आकाराची एक इमारत आहे. हे अनोखं हॉटेल फिलिपाईन्स या देशातील नीग्रो ऑक्सिडेंटल या ठिकाणी आहे. हॉटेलचे मालक रिकार्डो कॅनो ग्वापो टॅन यांच्या पत्नीच्या डोक्यात या हॉटेलची कल्पना सर्वात आधी आली होती. खरं तर ते एका रिसॉर्टची निर्मिती करत होते. पण आपलं रिसॉर्ट आणखी आकर्षक करण्यासाठी त्यांनी एका मोठ्या कोंबड्याच्या आकाराचे हॉटेल तयार केले. या हॉटेलमध्ये 15 आलिशान खोल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळतात. हे हॉटेल 115 फूट उंच आणि रुंदीला जवळपास 40 फूट आहे. पण इतका मोठा कोंबडा तयार करणे काही सोपे काम नव्हते. त्यासाठी कर्मचारी वर्ग एक वर्ष अहोरात्र मेहनत करत होता. हा कोंबडा तयार करताना सर्वात मोठे आव्हान होते ते वातावरणाचे. कारण या हॉटेलच्या परिसरात अनेकदा वादळी वारे वाहतात. त्यामुळे कोंबड्याच्या आकाराचे स्ट्रक्चर उभे करणे काही सोपे काम नव्हते. पण काही अमेरिकन इंजिनिअर्स आणि आर्किटेक्टच्या मदतीनं अखेर 8 सप्टेंबर 2024 रोजी ही इमारत पूर्णपणे उभी राहिली. सध्या हे कोंबड्याच्या आकाराचं हॉटेल इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून त्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील आपलं नाव कोरलं आहे.