इथे चक्क इमारत उचलून नऊ फूट मागे नेणार !

इथे चक्क इमारत उचलून नऊ फूट मागे नेणार !

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या भूसंपादनात जाणारी दोन मजली इमारत वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवण्याचा प्रयोग बारामती तालुक्यातील काटेवाडीजवळ मासाळवाडी येथे सुरू आहे.
ती इमारत 'जशीच्या तशी' पाठीमागे घेण्यात येत आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मुलाणी कुटुंबीयांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही इमारत उभी केली होती. या दुमजली इमारतीला 'आशियाना कॉम्प्लेक्स' असे नाव देण्यात आले होते. पालखी मार्गात येणारी ही दुमजली इमारत जमीनदोस्त होणार होती. वडिलांच्या आठवणी या इमारतीशी निगडित असल्याने मुलाणी कुटुंबीय कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. या इमारतीत वडिलांचे वास्तव्य होते, त्यामुळे ही जुनी आठवण जतन करण्याचा विचार त्यांनी सुरू केला. पालखी महामार्गाला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

इमारत आहे तशी पाठीमागे सरकवता येते, हे 'सोशल मीडिया'तील काही 'व्हिडीओ'वरून त्यांना समजले. त्यांनी याच पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले. या भागात हा पहिला प्रयोग असल्याने त्याची उत्सुकता अधिक आहे. काटेवाडीतील अकबर दादासाहेब मुलाणी व हसन मुलाणी या भावंडांनी त्यांची तीन हजार फूट दुमजली इमारत चक्क 9 फूट मागे सरकविण्याचे काम सुरू केले आहे. हे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे घेतली जाणार आहे. यासाठी हरियाना येथील एका कंपनीला काम देण्यात आलेले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news