

काठमांडू : नेपाळमध्ये ‘हिमालयन व्हियाग्रा’ या नावाने प्रसिद्ध असलेली ‘यार्सागुम्बा’ ही दुर्मीळ औषधी वनस्पती गेल्या अनेक वर्षांपासून तेथील दुर्गम भागातील लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन राहिली आहे. साधारणपणे यार्सागुम्बाचा दर ३० लाख रुपये प्रति किलो एवढा असतो. मात्र, सध्याच्या काळात या मौल्यवान वनस्पतीला कोणताही खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जीवाची पर्वा न करता दुर्गम डोंगरांमधून ही वनस्पती जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना ती कवडीमोलाने विकण्याची वेळ आली आहे. यामुळे नेपाळमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, ते रोजगाराच्या शोधात भारतात स्थलांतर करण्यास भाग पडत आहेत.
‘द काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार, ज्या लोकांनी ही औषधी बुरशी (कवक) शोधण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी आवश्यक साहित्यावर ६०,००० रुपये खर्च केले होते, त्यांना अत्यंत कष्टाने जेमतेम १,२०,००० रुपयांची कमाई झाली आहे. जीवाची बाजी लावून यार्सागुम्बा मिळवूनही त्यांना योग्य भाव मिळत नाहीये. यामागील प्रमुख कारण म्हणजे बाजारातील घटलेली मागणी आणि सध्या मिळणाऱ्या यार्सागुम्बाची खालावलेली गुणवत्ता. हवामान बदलामुळे आता यार्सागुम्बा मिळणे अत्यंत दुर्मीळ झाले आहे. जो काही माल मिळतोय, तोही पूर्णपणे विकसित झालेला नसतो, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला चांगला भाव मिळत नाही.
नेपाळमधील एका यार्सागुम्बा व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या या उत्पादनाचा सर्वात मोठा खरेदीदार चीन हा देश आहे. नेपाळमध्ये मिळणाऱ्या एकूण यार्सागुम्बापैकी तब्बल ९० टक्के माल एकट्या चीनला निर्यात केला जातो. परंतु, आता चिनी व्यापाऱ्यांनी नेपाळमध्ये येणे थांबवले आहे, कारण ते स्वतःच्या सीमेतच याचे संकलन करत आहेत. परिणामी, नेपाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांनीही स्थानिकांकडून यार्सागुम्बा खरेदी करणे बंद किंवा कमी केले आहे.
डोल्पा भागात तयार झालेला यार्सागुम्बा गेल्या वर्षी २० ते २४ लाख रुपये प्रति किलो दराने विकला गेला होता. या वर्षी हा दर ३० लाख रुपये प्रति किलो राहण्याचा अंदाज होता. गेल्या वर्षी मुगु भागात उत्पादित झालेला यार्सागुम्बा १८ लाख रुपये प्रति किलोने विकला गेला होता. या वर्षी आतापर्यंत विभागीय वन कार्यालयाने केवळ १० किलो यार्सागुम्बाच्या वाहतुकीचे परवाने जारी केले आहेत, तर गेल्या वर्षी २२ किलोसाठी परवाने दिले गेले होते. तसेच रारा नॅशनल पार्कने गेल्या वर्षी ३३ किलोचे परवाने दिले होते.