Metal Deposits in Space | आकाशगंगेतील महाकाय कृष्णविवराजवळ जड धातूंचा साठा

जेम्स वेब दुर्बिणीचा नवा शोध
Metal Deposits in Space |
Metal Deposits in Space | आकाशगंगेतील महाकाय कृष्णविवराजवळ जड धातूंचा साठा
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन/माँट्रियल : आपल्या आकाशगंगेच्या (मिल्की वे) केंद्रस्थानी असलेल्या महाकाय कृष्णविवराभोवती जड धातूंचा आश्चर्यकारक साठा अस्तित्वात असल्याचे ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ने केलेल्या नव्या निरीक्षणांतून समोर आले आहे. या धातूंमुळे पृथ्वीवर जड मूलद्रव्ये नेमकी कशी पोहोचली याचे नवे संकेत मिळू शकतात; मात्र, त्याच वेळी आपल्या कृष्णविवराशी संबंधित एक मोठे रहस्य उलगडणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते.

खगोलशास्त्राच्या परिभाषेत हायड्रोजन आणि हेलियमपेक्षा जड असणाऱ्या कोणत्याही मूलद्रव्याला ‘धातू’ मानले जाते; यात प्रामुख्याने ऑक्सिजन, कार्बन, लोह आणि सोन्यासारख्या घटकांचा समावेश होतो. हे घटक ताऱ्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्या गाभ्यात होणाऱ्या अणुकेंद्रकीय संमीलनातून तयार होतात. त्यानंतर ते अवकाशात फेकले जाऊन नवीन पिढीच्या ताऱ्यांचा भाग बनतात. शास्त्रज्ञांच्या मते, जेम्स वेब दुर्बिणीला दिसलेले हे घटक बहुधा सुपरनोव्हा म्हणजेच ताऱ्यांच्या महाविस्फोटातून बाहेर पडले असावेत. या महाविस्फोटांमुळे हे धातू आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ‘सॅजिटेरियस ए’ या अजस्र कृष्णविवराच्या परिसरात फेकले गेले.

वायुरूपात आढळलेल्या या धातूंचे रासायनिक प्रमाण जवळच्या अनेक ताऱ्यांसारखेच आहे. यावरून हे तारे आणि हा वायू एकाच कालखंडात निर्माण झाले असावेत, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. हे संशोधन १९ ऑक्टोबर रोजी ‘द ॲस्ट्रॉनॉमिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले असून, ते मे महिन्यात ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या आधीच्या अभ्यासावर आधारित आहे. या शोधनिबंधाच्या प्रमुख लेखिका आणि माँट्रियल येथील मॅकगिल विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्राच्या विद्यार्थिनी निकोल फोर्ड यांनी सांगितले, ‘आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेले कृष्णविवर आसपासचे पदार्थ स्वतःकडे खेचून घेत आहे, हे आपल्याला ठाऊक आहे; पण इतर महाकाय कृष्णविवरांच्या तुलनेत ते अत्यंत मंद गतीने आणि खूप कमी घटक गिळंकृत करत असल्याचे दिसून येते.

असे नेमके का घडत आहे, हे समजून घेण्यासाठी तेथे उपलब्ध असलेले घटक जसे की वायू, धूळ आणि भोवती फिरणारे तारे यांचे गुणधर्म तपासणे आवश्यक आहे.’ जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप पृथ्वीपासून सूर्याच्या विरुद्ध दिशेने सुमारे १५ लाख किलोमीटर (१० लाख मैल) अंतरावर असलेल्या ‘लॅग्रेंज पॉईंट २’ (L2) येथून कार्यरत आहे. या शक्तिशाली दुर्बिणीने कृष्णविवराजवळ तरंगणाऱ्या विशिष्ट वायूंच्या ढगांमधील उष्णतेच्या लहरी आणि त्या ढगांमध्ये सामावलेल्या धातूंचे अचूक प्रमाण नोंदवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news