मेक्सिकोमध्ये उष्णतेचा कहर; 85 माकडांचा मृत्यू

मेक्सिकोमध्ये उष्णतेचा कहर; 85 माकडांचा मृत्यू

मेक्सिको सिटी : सध्या संपूर्ण जगभरात तापमानाने कहर केला आहे. वाढलेल्या तापमानामुळे फक्त माणूसच नाही तर प्राणी आणि पक्षीही हैराण झाले आहेत. उष्माघातामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण उष्माघातामुळे जीव गमावणार्‍यांमध्ये फक्त माणूस नाही तर अन्य प्राण्यांचाही समावेश आहे. मेक्सिकोतील आग्नेय परिसरात असणार्‍या कोलमकाल्कोमधील जंगलात हॉऊलर माकडं उष्माघातामुळे मृत्युमुखी पडत आहेत. झाडांवरून फळे पडावीत, अशारीतीने ही माकडं खाली पडत असून त्यांच्या मृतदेहांचा जमिनीवर खच पडत आहे. आतापर्यंत 85 माकडांचा तिथे मृत्यू झाला आहे.

हॉऊलर माकड ही मेक्सिकोमधील माकडांची एक दुर्मीळ प्रजाती आहे. सध्या वाढलेले तापमान आणि मागील अनेक काळापासून पडलेल्या दुष्काळामुळे माकडांची स्थिती फार खराब आहे. संपूर्ण देशात सध्या भयानक उकाडा सहन करावा लागत आहे. या आठवड्यात तबास्को राज्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं होतं. यामुळे आतापर्यंत 85 हॉऊलर माकडांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 17 मार्चपासून ते 11 मेपर्यंत 26 लोकांनी उष्माघातामुळे प्राण गमावले आहेत.

तबास्को सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीने डिहायड्रेशनमुळे माकडांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. तबास्को राज्यातील तीन महापालिकांनी माकडांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. कोलमकाल्को जंगलात सर्वात जास्त माकडांचा मृत्यू झाला आहे. वन विभागातील कर्मचारी सध्या सर्व माकडांचे मृतदेह गोळा करत आहेत. माकडांना वाचवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून ठिकठिकाणी पाण्याचे मोठे टब आणि फळांची व्यवस्था केली आहे. जेणेकरून पाणी आणि अन्नाच्या कमतरतेमुळे माकडांचा मृत्यू होऊ नये. मेटल्ड हाऊलर माकडाचा समावेश इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टमध्ये करण्यात आला आहे.

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्यूअल लोपेज आब—ाडोर हेदेखील तबास्को राज्यातील आहेत. सध्या तापमान प्रचंड वाढलं असून मी सतत राज्यांचा दौरा करत आहे. याआधी कधीच मी इतका उकाडा सहन केलेला नाही. माकडांच्या मृत्यूमुळे मला दु:ख झालं आहे. माकडांचा मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यवस्था उभारण्याची गरज आहे, असं राष्ट्राध्यक्ष म्हणाले. मेक्सिकोच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटलं आहे की, आम्ही तापमान, दुष्काळ, डिहायड्रेशन, कुपोषण आणि पिकांवरील विषारी केमिकल फवारणीवर लक्ष ठेवत आहोत, जेणेकरून माकडांचा मृत्यू होऊ नये.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news