

नवी दिल्ली ः कडक उन्हाच्या तीव झळा आता जाणवू लागल्या आहेत. तीव सूर्यप्रकाश, वाढते तापमान आणि उष्ण वारे यांचा अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. या दिवसांमध्ये होणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे उष्माघात, डिहायड्रेशन आणि अशक्तपणा. जेव्हा आपल्यापैकी अनेकजण कामानिमित्त दुपारी घराबाहेर पडतात तेव्हा खऱ्या तीव उष्णतेचा सामना करावा लागतो. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी अन्न आणि पेयांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. त्यासाठी सब्जा बियांचे पाणी लाभदायक ठरू शकते.
कडक उन्हाळ्यात शरीर घामाच्या स्वरूपात पाणी आणि आवश्यक खनिजे वेगाने बाहेर काढते आणि त्यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी आणि उष्माघात यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या हंगामात आहारात नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे, जे केवळ शरीराला थंड ठेवत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात. सब्जा बियांमध्ये थंडावा असतो आणि त्यात भरपूर पोषक तत्त्वेही असतात. उन्हाळ्यात या बियांच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सब्जा बिया पोषक तत्त्वांचा एक स्रोत मानल्या जातात. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पोटासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, हेल्दी फॅट आणि कार्बोहायड्रेटस् देखील असतात. कमी कॅलरीजमुळे ते वजन वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात.
शिवाय सब्जा बिया ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि खनिजांचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत. या बियांचे पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या बिया थंड प्रकृतीच्या असतात, ज्यामुळे तीव सूर्यप्रकाशात उष्माघातापासून तुमचे संरक्षण देखील होऊ शकते. पाण्यात भिजवल्यावर या बिया जेलसारखे पदार्थ तयार करतात जे शरीराला थंड करण्यास मदत करू शकतात. यासाठी उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही या बियांचा वापर सरबत किंवा पाण्यात मिसळून करू शकता. उष्ण हवामानात शरीर लवकर डिहायड्रेट होते. सब्जा बिया हायड्रेशन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे उष्माघाताचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. या बियांमध्ये अँटिऑक्सिडंटस्, लोह आणि फायबर असतात, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. सब्जा बिया पोटाला आराम देतात. शिवाय त्यांच्या फायबर घटकांमुळे तुमच्या शरीरातील बद्धकोष्ठता, आम्लता कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात.