खास थेरपी बनवून स्वतःला केले कर्करोगमुक्त

खास थेरपी बनवून स्वतःला केले कर्करोगमुक्त

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर रिचर्ड स्कोलियर यांनी दावा केला आहे की, त्यांनी स्वतःच एक थेरपी म्हणजेच उपचार पद्धती विकसित करून त्याद्वारे स्वतःला कर्करोगमुक्त केले आहे. डॉक्टर आणि रिसर्च स्कॉलर असलेल्या रिचर्ड यांनी नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनीच याबाबतचे संशोधन केले होते आणि या शोधाच्या आधारे त्यांनी स्वतःवर उपचार केले. त्यानंतर वर्षभराच्या काळात ते ब्रेन कॅन्सरमधून मुक्त झाले आहेत. त्यांना स्टेज4 चा ग्लियोब्लास्टोमा होता, जो सध्या असाध्य मानला जातो. 57 वर्षांच्या रिचर्ड यांनी 'मेलेनोमा' संस्थेच्या सहाय्याने जून 2023 मध्ये ब्रेन ट्युमरवर जून 2023 मध्ये उपचार सुरू केले होते.

रिचर्ड यांनी 'एक्स'वर याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी गेल्या गुरुवारी वारंवार होणार्‍या ग्लियोब्लास्टोमाच्या तपासणीसाठी मेंदूचे एमआरआय स्कॅनिंग केले होते. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आता मला समजले आहे की, आता तो पुन्हा झालेला नाही किंवा तसे संकेतही नाहीत. त्यामुळे आता माझ्या आनंदाला आकाश ठेंगणे झाले आहे! कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार कॅन्सर इम्युनोथेरपी ही कर्करोग रोखणे, नियंत्रित करणे आणि नष्ट करणे यासाठी शरीराच्याच रोगप्रतिकारक यंत्रणेचा वापर करते.

याचवर्षी रिचर्ड स्कोलियर यांना मेलानोमा इन्स्टिट्यूट ऑस्ट्रेलियाच्या को-मेडिकल डायरेक्टर जॉर्जिना लाँग यांच्यासमवेत अशा जीवनरक्षक संशोधनासाठी 'ऑस्ट्रेलियन ऑफ द इअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उपचार सुरू होण्यापूर्वी काही महिने आधी ते अपस्माराचे झटके, यकृताची समस्या आणि न्यूमोनियाने ग्रस्त होते. आता स्कोलियर सर्व समस्यांमधून बाहेर पडले असून निरोगी जीवन जगत आहेत. ते रोज जिममध्ये व्यायामही करतात. रिचर्ड यांच्या सहकारी लाँग यांनी सांगितले की, त्यांनी विकसित केलेली ही उपचार पद्धती अद्याप सार्वत्रिक उपयोगासाठी मंजूर झालेली किंवा रेग्युलेटेड कोर्स बनलेली नाही. त्यासाठी अद्याप काही काळ जावा लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news