

लखनौ : मंदिरात घंटा असणे ही काही नवलाईची बाब नाही. देवाचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक घंटा वाजवूनच आत येत असतात. मात्र, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील अलीगंज येथे असलेल्या हनुमान मंदिरात एक-दोन नव्हे, तर 41 लाख घंटा आहेत. आता या घंटांचा लिलाव होणार आहे. भक्त नवस पूर्ण झाल्यावर या घंटा तिथे बांधतात. विशेष म्हणजे येथे बांधलेल्या घंटा सर्व आकाराच्या आहेत. अनेक भाविकांनी अनेक किलोच्या घंटा अर्पण केल्या आहेत. अशा स्थितीत मंदिर परिसर घंटांनी भरल्याने आता त्यांचा लिलाव होणार आहे.
मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश पांडे यांनी सांगितले की, हे मंदिर खूप प्राचीन आहे. त्याची स्थापना 6 जून 1783 रोजी झाली. हे मंदिर नवाब वाजिद अली शाह यांच्या पत्नीने बांधले होते. येथे येणारे भाविक नवसाच्या पूर्ततेसाठी चांदीचा मुकुट आणि घंटा बांधतात, जे मंदिराच्या स्टोअर रूममध्ये ठेवले जातात. आता मंदिराची स्टोअर रूम भरली आहे. अशा स्थितीत घंटा बांधण्यासाठी येणार्या नवीन भाविकांसाठी जागाच उरलेली नाही. या कारणास्तव या घंटांचा लिलाव करण्यात येत आहे. लिलावाद्वारे येणारा पैसा मंदिराच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.