

ओस्लो : जगभरात अनेक प्रकारचे छंदिष्ट आढळून येतात. काहींना फिरण्याचा शौक असतो तर काहींना खाण्यापिण्याचा. कोणी पेंटिंगचा छंद जोपासतो तर कोणी बागकामाचा छंद जीवापाड जपतो. देशविदेशात फिरणारे छंदिष्ट देखील असंख्य असतात. मात्र, अवघ्या 48 वर्षांचा एक छंदिष्ट असाही आहे, ज्याने इतक्या कमी वयात देखील एकदा नव्हे तर चक्क दोनवेळा अवघ्या विश्वाची परिक्रमा केली आहे. यात युद्धामुळे प्रभावित उत्तर कोरियाचाही समावेश आहे.
नॉर्वेमधील ओस्लो येथे राहणार्या गुन्नार गरफोर्स असे या अवलियाचे नाव आहे. त्याचा असा दावा आहे की, आजवर पृथ्वीतलावरील एकाही व्यक्तीने दोनवेळा पृथ्वीची परिक्रमा केलेली नाही आणि असा पराक्रम गाजवणारा तो एकमेव अवलिया आहे.
अलीकडेच गरफोर्सने आपल्या प्रवासाचा अनुभव शेअर केला. निर्जन टापूमधील धोकादायक प्रवास, बोत्सवानातील वाघाचे दर्शन, टोकियोतील ब्रेकफास्टसारखे अनेक अनुभव त्याने शब्दबद्ध केले. गरफोर्स हा ब्रॉडकास्ट पत्रकार असून 2008 ते 2013 या कालावधीत त्याने आपल्या पगारातून अनेक देशांचा प्रवास केली. या अनोखा छंद जपण्यासाठी त्याला संसारिक आयुष्य, आलिशान कार, आरामदायी घर असे सारे काही सोडावे लागले. पण, ते त्याने सारे केले आणि फक्त जगभर फिरत राहण्याचे ध्येय त्याने बाळगले.
2018 पर्यंत त्याने जगातील प्रत्येक देशाला किमान एकदा भेट दिली होती. पण, इतक्यावर देखील तो खूश नव्हता. त्यानंतर त्याने या सर्व देशांचा पुन्हा एकदा दौरा करणे सुरू केले. यादरम्यान त्याने युद्धज्वराने ग्रासलेल्या उत्तर कोरियासारख्या देशांचाही धोकादायक प्रवास पूर्ण केला. हा विक्रम पूर्ण करण्यासाठी त्याने विकेंडसह मोठ्या सुट्यांचा सदुपयोग केला. आता दोन वेळा जगभ्रमंती केल्यानंतर मात्र त्याने आपण यावर पूर्ण खूश असल्याचे म्हटले आहे.