

लंडन : हवामान बदलामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवीय प्रदेशांतील बर्फ झपाट्याने कमी होत असल्याचे नव्या वैज्ञानिक अभ्यासातून समोर आले आहे. १९७९ पासून ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकामधून तब्बल १२.५ ट्रिलियन टन, म्हणजेच सुमारे १२.५ लाख कोटी टन बर्फ कमी झाला आहे. यामुळे जागतिक समुद्रपातळीत सुमारे ३.१ सेंटिमीटरने वाढ झाली आहे. युरोपियन स्पेस एजन्सी (इएसए) आणि नासाच्या विविध उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून हा अंदाज काढण्यात आला आहे.
गेल्या सुमारे ४७ वर्षांत बर्फ वितळण्याचा वेग सातत्याने वाढत गेला असून, विशेषतः २०१० नंतर ही प्रक्रिया अधिक वेगवान झाल्याचे अभ्यासात दिसून आले. अमेरिकेवर १.५ मीटर जाडीचा बर्फवितळलेल्या बर्फाचे प्रमाण किती प्रचंड आहे, याची कल्पना यावरून येते की, हा संपूर्ण बर्फ एका ठिकाणी जमा केला तर संपूर्ण अमेरिकेच्या भूभागावर सुमारे १.५ मीटर जाडीचा बर्फाचा थर तयार होऊ शकतो. हा बर्फ वितळल्यामुळे झालेले पाणी सुमारे ३ क्वाड्रिलियन गॅलन, म्हणजेच अंदाजे १.१३ लाख कोटी कोटी लिटर असल्याचा अंदाज आहे. या पाण्यामुळे समुद्राच्या पातळीत झालेली वाढ जगभरातील किनारपट्टीच्या भागांसाठी महत्त्वाची ठरत आहे.
समुद्राचे उबदार पाणीही कारणीभूत
बर्फ कमी होण्यामागे केवळ वातावरणाचे तापमान वाढणे हेच कारण नाही. समुद्रातील तुलनेने उबदार पाणी बर्फाच्या थराखाली पोहोचून त्याची झीज वाढवत आहे. त्यामुळे बर्फ खालून आणि बाजूंनीही वितळत आहे.१९७० ते १९९० या काळात ध्रुवीय बर्फाच्या नुकसानीचा वेग तुलनेने कमी होता. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली आणि २०१०च्या दशकात बर्फ कमी होण्याचा वेग लक्षणीयरीत्या वाढला.समुद्र पातळीत झालेली वाढ किनारी शहरांमध्ये पूर, समुद्राचे पाणी जमिनीत घुसणे आणि किनारपट्टीची धूप यांचा धोका वाढवू शकते. त्यामुळे उपग्रहांच्या माध्यमातून ध्रुवीय बर्फातील बदलांचे सातत्याने निरीक्षण करणे हवामान बदलाचे परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे.