

लंडन : ईशान्य इंग्लंडमधील एका ऐतिहासिक किल्ल्यावर तार्यांनी भरलेल्या आकाशात एका फोटोग्राफरने हिरव्या रंगाच्या एका तेजस्वी ‘फायरबॉल’चे (मोठी उल्का कोसळतानाचा अग्नी) द़ृश्य आपल्या कॅमेर्यात टिपले आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना एका उल्केचा स्फोट झाल्याने हे नयनरम्य द़ृश्य पाहायला मिळाले.
सोमवारी (13 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार मध्यरात्रीनंतर काही वेळातच उत्तर समुद्राच्या वर (इंग्लंडच्या पूर्व किनारपट्टीजवळ) या उल्केचा स्फोट झाला. या अंतराळ पाषाणाचा वेग ताशी सुमारे 20,000 मैल (32,000 किमी) होता. वजनाला ही उल्का अत्यंत लहान (सुमारे 12 ग्रॅम) असली, तरी तिच्या प्रकाशझोताने लोकांचे लक्ष वेधून घेतले. फोटोग्राफर इयान स्प्रोट यांनी नॉर्थंबरलँड किनारपट्टीवरील ‘लिंडिसफार्न’ (ज्याला ‘होली आयलंड’ असेही म्हणतात) येथून हे द़ृश्य पाहिले. हे तेच ठिकाण आहे, जिथे इसवी सन 793 मध्ये वायकिंग्सनी भीषण हल्ला केला होता.
इयान आणि त्यांचे मित्र 16 व्या शतकातील ऐतिहासिक ‘लिंडिसफार्न किल्ल्या’च्या वर दिसणार्या आकाशगंगेचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हाच ही तेजस्वी उल्का आकाशातून जाताना दिसली. ‘हे द़ृश्य दिसताच आम्ही आनंदाने ओरडलो, मी खूप उत्साही होतो,’ असे स्प्रोटने सांगितले. ‘अमेरिकन मेटियर सोसायटी’च्या मते, ब्रिटनसह बेल्जियम, नेदरलँडस् आणि जर्मनीमधील किमान 230 लोकांनी या प्रकाशाची नोंद केली आहे.
अनेकांच्या डोअरबेल कॅमेर्यातही हे सात सेकंदांपर्यंत दिसणारे दृश्य कैद झाले आहे. जेव्हा अवकाशातील दगड पृथ्वीच्या वातावरणातील घर्षणामुळे अचानक फुटतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर प्रकाश ऊर्जा उत्सर्जित होते, ज्याला ‘फायरबॉल’ म्हणतात. या उल्केचा रंग हिरवा होता, जो त्या पाषाणातील मॅग्नेेशियम आणि निकेलच्या अस्तित्वामुळे असावा, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.