

वॉशिंग्टन : अनेक लोक आयुष्यभर जग फिरण्याचे स्वप्न पाहतात. मात्र नोकरी, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली त्यांची ही इच्छा अपूर्णच राहते. याउलट, काही जण आयुष्याच्या अशा टप्प्यावर जग पाहण्यासाठी घराबाहेर पडतात, ज्या वयात बहुतांश लोक घरी आराम करणे पसंत करतात. अमेरिकेतील ओहायो येथे राहणाऱ्या जॉय रायन यांची कहाणी अशीच थक्क करणारी आहे. जग त्यांना प्रेमाने ‘ग्रँडमा जॉय’ म्हणून ओळखते. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी आपला नातू ब्रॅड रायन याच्यासोबत जगातील सातही खंड फिरण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. नुकतेच दोघांनी थायलंड आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास केला. ऑस्ट्रेलिया हा त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाचा शेवटचा टप्पा ठरला. यासोबतच जॉय यांनी जगातील सर्व सात खंड पाहण्याची आपली इच्छा पूर्ण केली आहे.
जॉय यांच्या कहाणीतील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यांनी परदेश प्रवासाची सुरुवात खूप उशिरा केली. ज्या वयात लोक लांबच्या प्रवासाचा विचारही करत नाहीत, त्या वयात जॉय यांनी आपला पहिला पासपोर्ट काढला. ९१ व्या वर्षी पासपोर्ट मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी जगातील इतर देशांची दारे खुली झाली. यानंतर त्यांनी नातू ब्रॅडसोबत अनेक देशांचा प्रवास केला. दोघांनी केनियामध्ये हत्ती पाहिले, आयर्लंडमधील जुन्या किल्ल्यांची सफर केली आणि थायलंडमध्ये बौद्ध भिक्खूंची भेटही घेतली. जॉय आणि ब्रॅड यांचा हा प्रवास अचानक सुरू झाला नव्हता. यामागे कौटुंबिक नाते पुन्हा घट्ट करण्याची एक भावुक कहाणी आहे.
ब्रॅड यांच्या मते, त्यांच्यात आणि आजी जॉय यांच्यात सुमारे १० वर्षे संवाद नव्हता. त्यानंतर २०१५ च्या शरद ऋतूमध्ये त्यांनी आजीशी संपर्क साधला आणि विचारले की, त्या त्यांच्यासोबत ‘ग्रेट स्मोकी माऊंटन्स’मध्ये कॅम्पिंगसाठी येतील का? आजीने यापूर्वी कधीही डोंगर पाहिले नव्हते, हे ब्रॅड यांना माहीत होते. त्यांना आजीला काहीतरी नवीन दाखवायचे होते आणि तिच्यासोबत वेळ घालवायचा होता. जॉय यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. हा छोटासा प्रवास पुढे जगभ्रमंतीच्या मोठ्या प्रवासात बदलेल, याची कल्पना कदाचित त्यावेळी दोघांनाही नव्हती.
कॅम्पिंग ट्रिपनंतर जॉय आणि ब्रॅड यांनी अमेरिकेतील वेगवेगळे नॅशनल पार्क फिरण्यास सुरुवात केली. डोंगर, जंगले आणि निसर्गसौंदर्य त्यांच्या प्रवासाचा भाग बनत गेले. दोघांनी हळूहळू अमेरिकेतील सर्व ६३ नॅशनल पार्क पाहण्याचे लक्ष्य ठेवले. मे २०२३ मध्ये त्यांनी देशातील शेवटच्या नॅशनल पार्कचा प्रवासही पूर्ण केला. यानंतर दोघांनी अमेरिकेबाहेर पडून जगातील इतर भाग पाहण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान जॉय यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी पहिला पासपोर्ट काढला आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे पर्व सुरू झाले. सातासमुद्रापार सातही खंड फिरण्याच्या या प्रवासाचा शेवटचा टप्पा ऑस्ट्रेलिया ठरला.