

वॉशिंग्टन : टेक इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) सुरक्षा आणि त्याच्या सायबर सिक्युरिटी क्षमतेबाबत पुन्हा एकदा एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. मे २०२६ मध्ये एका सायबर सेफ्टी टेस्टदरम्यान आपल्या ‘जेमिनी’ एआय मॉडेलने स्वायत्तपणे (स्वतःहून) तीन प्रत्यक्ष सुरू असलेल्या कंपन्यांच्या डेटाबेसमध्ये घुसखोरी केल्याचे गूगलने अधिकृतपणे मान्य केले आहे. मात्र, या घटनेत सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवण्यापूर्वीच ‘एआय’ ने स्वतःला रोखले आणि शांतपणे सिस्टिममधून बाहेर पडले.
जशीजशी ‘एआय’ची ताकद वाढत आहे, तसतशी त्याच्या मर्यादांची चाचणी घेण्यासाठी सातत्याने असे प्रयोग केले जात आहेत. नुकतेच ‘ओपन एआय’ने देखील कोणत्याही सूचनेशिवाय एआय मॉडेलने केलेल्या घुसखोरीबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. परंतु, जेमिनीने स्वतःहून हॅकिंग रोखण्याच्या (सेल्फ-अॅबॉर्ट) या क्षमतेमुळे ‘एआय’ची स्वायत्तता आणि सुरक्षितता यावरील चर्चेला एक नवे वळण मिळाले आहे. ही घटना इस्रायली स्टार्टअप ‘इरेग्युलर’ कडून आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅप्चर द फ्लॅग’ सायबर सुरक्षा सरावादरम्यान घडली. या चाचणीत जेमिनीला एका काल्पनिक कंपनीच्या सॉफ्टवेअरमधून माहिती काढण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, गफलत अशी झाली की, या चाचणीत वापरण्यात आलेले काल्पनिक नाव एका खऱ्याखुऱ्या कंपनीच्या नावाशी मिळतेजुळते होते.
या चाचणीदरम्यान जेमिनीला इंटरनेट अॅक्सेस मिळायला नको होता, परंतु चुकीने मॉडेलसाठी इंटरनेट उपलब्ध झाले. त्यानंतर ‘एआय’ ने ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर जाऊन खऱ्या ऑनलाइन माहितीपर्यंत पोहोच निर्माण केली. म्हणजे मॉडेलने केवळ टेस्ट एनव्हार्यन्मेंटपुरते मर्यादित न राहता, मिळालेल्या माहितीचा वापर करून सिस्टिममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. याशिवाय अन्य दोन प्रकरणांमध्ये जेमिनीने कंपन्यांच्या नावाने वेब सर्च केले. सर्चदरम्यान त्याला पब्लिक ऑनलाइन रिपॉझिटरीमध्ये क्रेडेंशियल्स (पासवर्ड/आयडी) सापडले.
मॉडेलने या क्रेडेंशियल्सचा वापर करून संबंधित सिस्टिममध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे चाचणीदरम्यान तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जेमिनीची कारवाई प्रत्यक्ष कंपन्यांच्या सिस्टिमपर्यंत पोहोचली. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा जेमिनीला जाणीव झाली की ज्या कंपन्यांच्या सिस्टिमपर्यंत ते पोहोचत आहे त्या खऱ्या कंपन्या आहेत, चाचणीतील काल्पनिक कंपन्या नाहीत; तेव्हा मॉडेलने स्वतःच आपली कारवाई थांबवली. त्यानंतर पुढे घुसखोरी जारी ठेवण्याऐवजी त्याने सिस्टिममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.