1200-Year-Old Gold | मुलीला जमिनीखाली सापडला १,२०० वर्षे जुना सोन्याचा तुकडा!

1200-Year-Old Gold |
1200-Year-Old Gold | मुलीला जमिनीखाली सापडला १,२०० वर्षे जुना सोन्याचा तुकडा!
Published on
Updated on

लंडन : ब्रिटनमध्ये पुरातत्त्वशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय अमेरिकन विद्यार्थिनीला नशिबाची साथ अशी काही लाभली की, सर्वजण अवाक झाले आहेत. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये पदवीचे शिक्षण घेणारी यारा सूजा जेव्हा आपल्या आयुष्यातील पहिल्या उत्खननासाठी उतरली, तेव्हा अवघ्या ९० मिनिटांत म्हणजेच दीड तासाच्या आत तिच्या हाती १,२०० वर्षे जुना सोन्याचा एक दुर्मीळ तुकडा लागला. ९ व्या शतकातील ही कलाकृती ब्रिटनच्या मध्ययुगीन इतिहासाबाबत अनेक नवीन आणि मोठे प्रश्न उपस्थित करत आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील रहिवासी असलेली २० वर्षीय यारा सूजा इंग्लंडच्या न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये पुरातत्त्वशास्त्राची विद्यार्थिनी आहे. ती तिच्या सहकाऱ्यांसोबत उत्तर इंग्लंडमधील नॉर्थम्बरलँड नॅशनल पार्कमध्ये असलेल्या रेड्सडेल खोऱ्यात उत्खनन करत होती. पहिल्याच प्रात्यक्षिक उत्खननाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या दीड तासात तिला जमिनीत गाडलेली एक अनोखी वस्तू दिसली. ती स्वच्छ केल्यावर ते ९ व्या शतकातील म्हणजेच सुमारे १,२०० वर्षे जुनी सोन्याचे एक सुंदर नक्षीकामाची वस्तू असल्याचे स्पष्ट झाले. विद्यापीठाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही कलाकृती आकाराने अवघी १.५ इंच आहे. तिच्या एका टोकावर अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेला सजावटीचा भाग बनवलेला आहे.

सुरुवातीच्या मध्ययुगीन ब्रिटनच्या काळातील ही कलाकृती असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोन्याच्या या छोट्या तुकड्याचा वापर एखाद्या धार्मिक किंवा राजकीय समारंभादरम्यान केला जात असावा. इतिहासकारांच्या मते, नवव्या शतकात ब्रिटनमध्ये सोने केवळ राजे-महाराजे आणि उच्चभ्रू वर्गाकडेच असायचे. या अनोख्या शोधाने यारा सूजा अत्यंत उत्सुक आहे. तिने सांगितले की, गेल्या वर्षी आजारपणामुळे ती बर्डोसवाल्ड रोमन किल्ल्याच्या उत्खननात सहभागी होऊ शकली नव्हती. परंतु, रेड्सडेल येथील या शोधाने तिच्या जुन्या नुकसानाची भरपाई केली. १,००० वर्षांहून अधिक काळापासून लपलेली गोष्ट सर्वात आधी पाहणे हे तिच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news