निएंडरथलकडून मिळाली मोठ्या नाकाची देणगी!

निएंडरथलकडून मिळाली मोठ्या नाकाची देणगी!

वॉशिंग्टन : युरोप व आशियाच्या थंड प्रदेशांमध्ये निएंडरथल नावाची मनुष्याची एक वेगळी प्रजाती अस्तित्वात होती. हाडे गोठवणार्‍या थंडीत हे लोक राहत असल्याने निसर्गानेच त्यांना शरीर उबदार ठेवण्यासाठी मोठ्या नाकाची देणगी दिलेली होती. त्यांचे मोठे नाक हे 'नॅचरल सिलेक्शन' म्हणजेच नैसर्गिक निवड असल्याप्रमाणेच होते जेणेकरून ते थंड प्रदेशात तग धरून राहू शकतील.

अशा ठिकाणी नाकाद्वारे घेतलेली थंड व कोरडी हवा उबदार व आर्द्रतायुक्त करण्यासाठी त्यांना अशा उंच व लांब नाकांचा उपयोग होत असे. कालांतराने अफ्रिकेतून आलेल्या व आधुनिक माणसाचे पुर्वज असलेल्या होमोसेपियन्सबरोबर हे निएंडरथल मिसळून गेले व त्यांनी अशा लांब नाकाचे जीन्स किंवा जनुके पुढील पिढ्यांना दिले.

आधुनिक माणूस ज्यांच्यापासून विकसित झाला ती मानव प्रजाती म्हणजे होमोसेपियन्स. हे मानव अफ्रिकेतून आले असे मानले जाते. युरेशियामध्ये ते ज्यावेळी निएंडरथल लोकांच्या संपर्कात आले त्यावेळी त्यांच्यामध्ये संबंध निर्माण झाले. या संबंधातून पुढील पिढ्यांमध्ये निएंडरथल लोकांच्या लांब नाकाशी संबंधित जनुकेही संक्रमित झाली असे संशोधकांना वाटते. या संशोधनासाठी ब्राझील, कोलंबिया, चिली, मेक्सिको आणि पेरूमधील सहा हजार लोकांच्या डीएनएचे नमुने गोळा करण्यात आले व त्यांचा अभ्यास करण्यात आला.

हे सर्व लोक लॅटिन अमेरिकन लोक युरोपियन, स्थानिक अमेरिकन किंवा अफ्रिकन वंशाच्या लोकांमध्ये मिसळलेले आहेत. त्यांच्या चेहर्‍याच्या फोटोंशी त्यांच्या जनुकीय माहितीची तुलना करून पाहण्यात आली. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'कम्युनिकेशन्स बायोलॉजी' या नियतकालिकात प्रसिपद्ध करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news