

हेलसिंकी : पृथ्वीवर सौर वादळ केव्हा येईल, याचा अंदाज आता वनसंपदेच्या माध्यमातून वर्तवला जाणार आहे. सूर्याचे सातत्याने निरीक्षण करता त्याचे कालचक्र सांगते की, भविष्यात सूर्यावर सौरवादळ केव्हाही येऊ शकेल. या सौर वादळाचे पृथ्वीवरही प्रतिबिंब उमटत असते. संशोधकांना आता असे आढळून आले आहे की, मोठी सौर वादळे केव्हा येऊ शकतात, याचा आता पृथ्वीवरील वनसंपदेवरूनही अंदाज वर्तवणे शक्य होऊ शकते. हेलसिंकी विद्यापीठाने याबाबत अभ्यास केला आहे. लेपलँड या झाडावर अभ्यास केला गेला असून, त्याआधारे हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.
लेपलँड झाडाच्या फांद्यांवर अभ्यास करत त्याच्या हालचाली टिपून पुढील सौर वादळाचा अंदाज वर्तवणे सहज शक्य आहे, असे या संशोधकांचा दावा आहे. हेलसिंकी विद्यापीठातील क्रोनोलॉजी लॅबोरेटरीचे संचालक ओईनोनेन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, 'रेडिओकार्बन ब्रह्मांडाच्या मार्करप्रमाणे आहे. जो पृथ्वी, सौर मंडळ आणि बाह्य अंतराळातील संलग्न घटनांची माहिती देत असतो.'
सौर वादळांचा आराखडा तयार करणे आणि त्यांचे सातत्याने येणे समजून घेणे विशेष महत्त्वाचे असते. आता छोट्या वादळांवर सातत्याने लक्ष ठेवले जाते; पण कॅरिंग्टनसारखी मध्यम वा मोठ्या आकाराची वादळे कमी प्रमाणात येत असल्याने त्यांचा अंदाज वर्तवणे काहीसे कठीण ठरत होते. आता नव्या संशोधनामुळे या परिस्थितीत बदल होण्याची संशोधकांना आशा वाटते.