आफ्रिकेत प्रथमच दिसला अल्बिनो डॉल्फिन

आफ्रिकेत प्रथमच दिसला अल्बिनो डॉल्फिन

जोहान्सबर्ग : अल्बिनो म्हणजेच सफेद पशू-पक्षी निसर्गात पाहायला मिळत असतात. त्यांच्यामध्ये रंगद्रव्ये (मेलानिन पिग्मेंटस्) नसल्यामुळे ते आपल्या प्रजातीच्या अन्य पशू-पक्ष्यांच्या रंगासारखे नसतात. असे 'अल्बिनो' डॉल्फिन मासे क्वचितच पाहायला मिळतात. आता आफ्रिकेत अल्गोआ बे या किनार्‍याजवळ बोटलनोज डॉल्फिनचे असेच एक पांढरे पिल्लू दिसून आले आहे. कदाचित हे आफ्रिकेत आढळलेले पहिलेच अल्बिनो डॉल्फिन असेल असे संशोधकांना वाटते.

हे पिल्लू अन्य सर्वसामान्य रंगाच्या सुमारे दोनशे डॉल्फिनसमवेत पाण्यात पोहत होते. त्यावेळी एका जोडप्याने त्याला पाहिले व त्याची छायाचित्रे टिपून घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या केप प्रांतात हा अल्गोआ बे आहे. सागरी जीवन न्याहाळण्याची संधी नेहमीच याठिकाणी मिळत असते. लॉईड एडवर्डस् या बोट कॅप्टनने व त्याच्या पत्नीने याठिकाणी अल्बिनो डॉल्फिनला पाहिले.

हा इंडो-पॅसिफिक बोटलनोज डॉल्फिनच्या (टर्सिओप्स एडंकस) प्रजातीचा होता. एडवर्डस् यांनी सांगितले की दोनशे डॉल्फिनच्या समूहात मला अचानक एक पांढरी झलक दिसली. मी नीट न्याहाळून पाहिल्यावर हे एक पांढरे पिल्लू असल्याचे दिसून आले. ते एक महिन्याचे असावे आणि त्याची लांबी 3.3 फुटांची होती. पूर्णपणे पांढर्‍या रंगाचे हे पिल्लू या समूहात उठून दिसत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news