

दुबई : आज आपण जेव्हा आखाती देशांचा विचार करतो, तेव्हा डोळ्यासमोर येतात तेथील गगनचुंबी इमारती, अफाट संपत्ती आणि आधुनिक जीवनशैली. मात्र, या सर्व प्रगतीचा पाया सव्वाशे वर्षांपूर्वी इराणमध्ये लागलेल्या एका शोधावर आधारलेला आहे. 1908 मध्ये इराणमध्ये पहिल्यांदा तेलाचा साठा सापडला आणि त्यानंतर संपूर्ण आखाती क्षेत्राचे नशिबच पालटले.
26 मे 1908 रोजी इराणच्या नैर्ॠत्य भागातील ‘मस्जिद-ए-सुलेमान’ या ठिकाणी जमिनीतून तेलाची पहिली धार उसळली. हा केवळ इराणसाठीच नाही, तर संपूर्ण आखाती देशांसाठी एक क्रांतिकारी क्षण ठरला. या शोधानंतर मध्यपूर्वेतील भूराजकीय महत्त्व एका रात्रीत बदलले आणि पाश्चात्य देशांचे लक्ष या वाळवंटी प्रदेशाकडे वळले. इराणमधील यशानंतर इतर आखाती देशांमध्येही तेलाचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सौदी अरेबिया : 1938 मध्ये सौदी अरेबियातील ‘दम्माम’ येथे तेलाचा प्रचंड साठा सापडला, ज्याने देशाला जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवले. कुवेत आणि कतार : 1930 आणि 40 च्या दशकात येथेही तेलाचे शोध लागले. संयुक्त अरब अमिराती : 1950 च्या दशकात अबुधाबीमध्ये तेल सापडल्यानंतर अमिरातीचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली.
तेलाच्या शोधापूर्वी या देशांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने मासेमारी, मोत्यांचा व्यापार आणि खजुराच्या शेतीवर अवलंबून होती. मात्र, ‘काळ्या सोन्या’मुळे मोठे बदल घडून आले. तेलाच्या निर्यातीतून मिळणार्या अफाट पैशामुळे या देशांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक झाले. दुबई, दोहा आणि रियाध यांसारखी आधुनिक शहरे वाळवंटात उभी राहिली. बुर्ज खलिफासारखी जागतिक आश्चर्यं याच संपत्तीतून साकारली. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर नियंत्रण मिळाल्यामुळे हे देश जागतिक राजकारणात ‘किंगमेकर’ बनले. आज 1908 च्या त्या ऐतिहासिक घटनेला 10 दशकांहून अधिक काळ लोटला आहे. आता हे देश केवळ तेलावर अवलंबून न राहता पर्यटन, तंत्रज्ञान आणि सौर ऊर्जेकडे वळत आहेत. सौदी अरेबियाचा ‘व्हिजन 2030’ हा प्रकल्प याचेच उत्तम उदाहरण आहे.