वॉशिंग्टन : मानवामध्ये पुरुष लिंगनिश्चिती करणारे गुणसूत्र 'वाय क्रोमोसोम' या नावाने ओळखले जाते. या 'वाय' गुणसूत्राचे प्रथमच पूर्ण सिक्वेन्स करण्यात म्हणजेच अनुक्रम लावण्यात यश आले आहे. हे मानवातील सर्वात लहान गुणसूत्रांपैकी एक असून पूर्णपणे अनुक्रम लावलेले ते अखेरचे गुणसूत्र आहे.
'वाय' गुणसूत्राच्या सिक्वेन्समधील पोकळी (गॅप्स) भरून काढण्यात संशोधकांना यश आले. या गुणसूत्राच्या डीएनए कोडचा पहिला ड्राफ्ट वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्याचे पूर्ण सिक्वेन्सिंग होण्यास वीस वर्षे लागली! या 'मेल सेक्स क्रोमोसोम'मधील जीन्सचा संपूर्ण कॅटलॉग या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या संशोधनामुळे 'वाय' गुणसूत्रामधील जनुकांचे वैविध्य पाहता येणे शक्य होईल. त्यामुळे विविध वैद्यकीय उपचारांच्या संशोधनाला चालना मिळू शकेल. जगभरातील 40 पेक्षाही अधिक पुरुषांमधील 'वाय' गुणसूत्रांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. ऑक्सफर्ड ब्रूक्स युनिव्हर्सिटीतील डियाने न्यूबरी यांनी याबाबतची माहिती दिली.