भारतातील विवाह सोहळे अन्य देशांतील विवाह सोहळ्याप्रमाणे नसतात. आपल्याकडच्या लग्न समारंभात खर्चात कोणतीही कसर ठेवली जात नाही. मग सामान्य घरातील व्यक्ती असो किंवा अंबानींसारख्या अब्जाधीशाच्या घरातील विवाह असो. वधू-वर पक्ष मंडळी लग्नात बडदास्त ठेवण्यात कोणतीही उणीव ठेवत नाहीत. विवाह सोहळ्यासाठी पालक आयुष्यभराची कमाई पणाला लावतात आणि मुला-मुलींचा दणक्यात बार उडवून देतात. साहजिकच अशा सोहळ्यावर देशातील मोठा व्यापारी वर्ग अवलंबून असतो.
यंदा 12 डिसेंबरपर्यंत चालणार्या लग्नसराईच्या हंगामात देशभरात सुमारे 35 लाख लग्नसोहळे पार पडतील, असा अंदाज आहे. या सोहळ्यांमध्ये खर्च होणार्या वस्तू आणि सेवांचे मूल्य 5.9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे केवळ बाजारालाच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला नवीन चालना मिळेल. एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे विवाह सोहळ्यातील सनई चौघड्यांचे स्वरही ऐकावयास मिळतील. अर्थात या निवडणुका महाराष्ट्र, झारखंडपुरत्याच मर्यादित असल्या तरी देशभरातील नेते मंडळी, कार्यकर्ते दोन्ही राज्ये आपल्याच पक्षाकडे कसे येतील, याच्या कामाला लागले आहेत आणि त्याचा कळत-नकळत परिणाम त्यांच्याही राज्यावर होत आहे. विवाहाच्या हंगामाचा विचार केला तर यावेळी वेडिंग सिझन बाजारासाठी मोठा बूस्टर डोस ठरणार आहे. विवाहावरचा वाढता खर्च बाजारात चैतन्य निर्माण करणारा असला तरी काही निरर्थक खर्च विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.
भारतातील विवाह सोहळे अन्य देशांतील विवाह सोहळ्याप्रमाणे नसतात. आपल्याकडच्या लग्न समारंभात भारतीय विवाह उद्योगाचे मूल्य सुमारे 130 अब्ज डॉलर आहे. खरे तर भारतीय कुटुंबे शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च करतात. सरासरी भारतीय लग्नासाठी सुमारे 15 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 13 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च अगदी शाळेपासून ते मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणावर खर्च केलेल्या रकमेच्या जवळपास दुप्पट आहे. यंदा आपल्याकडे विवाहाचे मुहूर्त 12 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते महिनाभर चालणार आहेत. परिणामी देशाच्या आर्थिक चक्राला पुन्हा वेग येणार आहे, असे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. एका अंदाजानुसार या विवाहाच्या हंगामात देशभरात सुमारे 48 लाख विवाह होतील. या माध्यमातून सुमारे सहा लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 35 लाख लग्न सोहळ्यासह एकूण व्यवसाय 4.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता. लग्न सोहळा प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये होतो. पण खर्चाचे प्रमाण वेगवेगळे असतात. काही लग्नांमध्ये कोट्यवधी रुपये उधळतात तर काही लग्न केवळ दोन-तीन लाख रुपयांमध्ये उरकले जातात. जाणकारांच्या मते, यावर्षी बहुतेक लग्नांमध्ये 3 ते 15 लाखांचा खर्च येऊ शकतो; तर 50 हजार लग्नांमध्ये 50 लाख रुपये आणि एक कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाईल.
केवळ राजधानी नवी दिल्लीचा विचार केला तर एका आकडेवारीनुसार केवळ साडेचार लाख विवाह सोहळे विविध भागात होतील आणि त्यातून दीड लाख कोटींची उलाढाल होणे शक्य आहे. या खर्चात खरेदीचा समावेश नाही. कारण ही खरेदीदारी दिवाळीच्या अगोदरपासूनच सुरू झालेली असते. कपडे, दागदागिने यांच्या खरेदीचा हंगाम दसर्यापासूनच सुरू झालेला असतो. दिवाळीच्या काळात सेलमध्ये डिस्काऊंट मिळत असेल तर बहुसंख्य मंडळी या जोरावर शॉपिंग करतात. वास्तविक विवाहाच्या हंगामात तारखा काढणार्यांनी अशा काही विशेष तिथी काढल्या असून त्या बळावर विवाहाचे व्यवस्थापन करणार्यांना मागणी प्रचंड राहील अणि प्रत्येक आवश्यक वस्तू महाग होत या जोरावर कमाई भरपूर होईल. एरव्ही शंभर रुपयांना मिळणारे हार या काळात पाचशे ते हजार रुपयांना मिळतात. यावर्षी 12 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या काळात विवाहाचे बंपर मुहूर्त आहेत. दोन महिन्यांत जवळपास अठरा मुहूर्त आहेत. 17 डिसेंबरनंतर एक महिन्यापर्यंत मुहूर्त नाहीत आणि लग्नाच्या धामधुमीला थोडी विश्रांती मिळेल. जानेवारी मध्यपासून मार्च 2025 पर्यंत विवाहांचा उच्चांक नोंदला जाईल. विवाहाच्या या मुहूर्तांनी बाजारातील मागणीचा पुरवठा योग्यरीतीने व्हावा यासाठी अतिशय चांगल्यारीतीने नियोजन केले आहे.